पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून फेब्रुवारी 2018 ते फेब्रुवारी 2019 या काळातील उपक्रम
महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली माहिती
पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे फेब्रुवारी 2018 ते फेब्रुवारी 2019 या काळात शहरातील 1 हजार 336 गरोदर माता आणि 181 मधुमेहाच्या रुग्णांना स्वाईन फ्लूची मोफत देण्यात आली आहे. याबाबतची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिली. शहरात महापालिकेच्या आठ रुग्णालये आणि 27 दवाखान्यांमध्ये स्वाईन फ्लू प्रतिबंधक उपाय म्हणून लसीकरण केले जाते. ’स्वाईन फ्लू’चा धोका गरोदर महिला, लहान मुले व असाध्य आजार असणा-यांना जास्त प्रमाणात असतो. या जीवघेणा आजाराचा धोका टळण्यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणून महापालिकेने लसीकरणाची मोफत सोय केली आहे. महापालिका रुग्णालयामध्ये 944 लस आणि पाच हजार टॅमी फ्लू औषधांचा साठा उपलब्ध आहे. शहरातील उच्च रक्तदाब, मधुमेह व हृदयविकार यासारखे आजार असणार्या नागरिकांनी काळजी व्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केली आहे.
रूग्ण वाढण्याची शक्यता
सध्या वातावरणात सातत्याने बदल होत आहे. सकाळी थंडी तर दुपारी कडक उन आणि संध्याकळी थंडी या वातावरणातील बदलाने स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी शहरात ‘स्वाईन फ्लू’ने थैमान घातले होते. या आजाराने 34 रुग्ण मृत्यूमुखी पडलेले होते. यंदा जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात सात बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा स्वाईन फ्लू सक्रिय होताना दिसत आहे. यामुळे शहरात सद्यस्थितीत नागरिकांना ’टॅमी फ्लू’ची औषधे व लसीचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी महापालिका रुग्णालयात जाऊन लस घेण्याचे, आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
रूग्णालयात तपासणी करावी
महापालिकेतील स्वाईन फ्लू विभागाचे समन्वयक डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले की, गरोदर महिला, उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग यासारख्या रुग्णांनी ‘स्वाईन फ्लू’ची लस घेतली पाहिजे. सद्यस्थितीत शहरातील स्वाईन फ्लू आजार आटोक्यात आलेला आहे. परंतु, नागरिकांनी स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यास रुग्णालयात तपासणी करण्याची आवश्यकता आहे.