जळगाव : आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर भाविक जात. अशा भाविकांसाठी आनंदाची बातमी असून 8 जुलै ते 21 जुलै दरम्यान जळगाव आगार विभागातर्फे ठिकठिकाणांहून 138 बसेस पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. ज्या गावाहून थेट पंढरपूर साठी प्रवासी उपलब्ध असतील त्या ठिकाणाहून ज्यादा गाडीची सुविधा करण्यात आली आहे. दर्शनानंतर पुन्हा त्याच गावी प्रवाशांना सोडण्यात येणार आहे. पंढरपूर यात्रेसाठी आरक्षणाची सुविधाही उपलब्ध असल्याची माहितीविभागीय नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी दिली. तसेच विभागातून जालना आगारासाठी 50 बसेस देण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विशेष स्थानकाची निर्मिती
पंढरपूर येथे जळगाव विभागासाठी स्वंतत्र बस स्थानकाची निर्मिती करण्यात आली आहे. या स्थानकातून जळगाव जिल्हातील यात्रेकरूंसाठी गाडी निघणार आहे. पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखाना, विठ्ठल नगर या ठिकाणी जळगाव विभागातील गाड्या लागणार आहेत. प्रवाशांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. यात्रेसाठी विभागाने 28 कर्मचारी व एका अधिकार्याची नियुक्ती करण्यात आली आहे. यात्रेचे नियोजन नगर येथील विभागीय वाहतूक अधिकारी यांच्या देखरेखीखाली करण्यात आले आहे.
तालुक्याच्या ठिकाणाहून बसेसचे नियोजन
जळगाव विभागात येणार्या विविध तालुक्यातून गाड्यांची संख्या नियोजित करण्यात आली आहे. जळगाव बस स्थानकातून 22, जामनेर 14, पाचोरा 10, चाळीसगाव 20, अमळनेर 10, चोपडा 10, यावल 15, रावेर 10, मुक्ताईनगर 9, भुसावळ 10, एरंडोल 8 अशा एकूण 138 बसेस जळगाव विभागातून सुटणार असून याचा प्रवाशांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी केले आहे. प्रवाशांची गर्दी पाहता जळगाव विभागातून आरक्षणाची सुविधा करण्यात आली आहे. बस स्थानकात जाऊन आगाऊ आरक्षण सुविधा यात्रेकरूंसाठी उपलब्ध आहे. तसेच बसमध्ये बस मध्ये प्रथोमचार पेटी, बस स्वच्छते वर लक्ष देण्यात आले आहे. तसेच मधेच जर बस खराब झाली तर पर्यायी गाडीची व्यवस्था करण्यात येवून भाविकाला कुठल्याही परिस्थितीत पांडुरंगाचे दर्शनासाठी घेवून जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.