अमळनेर : तालुक्यातील अंचलवाडी येथून 14 लाखांचे पोकलँड मशीन लांबवणार्या भामट्यासह या मशीनची खरेदी करणार्या भामट्याला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. नवनीत देवाजी पाटील (रा.बाभूळगाव, ता. शिंदखेडा) असे चोरट्याचे तर हजरतउल्ला उर्फ राजू रहमतउल्ला खान (चाळीसगाव रोड, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
अंचलवाडी गावाजवळून लांबवले पोकलॅण्ड मशीन
अंचलवाडी येथे पावसामुळे डांबरीकरणाचे काम बंद झाल्याने ठेकेदार राज नामदेव पाटील (मानराज पार्क, पिंप्राजाळ, जळगाव) यांनी गावापासून काही अंतरावर 14 लाख किमतीचे पोकलॅण्ड मशीन रस्त्याच्या कडेला लावले होते. अज्ञात चोरट्याने ते चोरुन नेल्याने अमळनेर पोलिसात 29 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे मशीन हे नवनीत देवाजी पाटील (रा. बाभूळगाव ता. शिंदखेडा) याने चोरुन नेल्याचे स्पष्ट झाल्याने त्यास अटक करण्यात आली व न्यायालयाने त्यास 2 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीदरम्यान आरोपीने मशीनची चोरी करीत ते धुळ्यातील भंगार व्यावसायीक हजरतउल्ला उर्फ राजू रहमतउल्ला खान (चाळीसगाव रोड, धुळे) यास विक्री केल्याची कबुली दिल्याने त्यासदेखील अटक करण्यात आली.
पोकलॅण्ड मशीनचे स्पेअर पार्क काढले विक्रीसाठी
आरोपी नवनीत पाटील याने पोकलॅण्ड स्वतःच्या मालकिचे असल्याचे सांगत क्रेन चालकाच्या मदतीने धुळ्यात मशीन आणून भंगार विक्रेत्यास विक्री केले व त्यानेदेखील मशीनचे स्पेअर पार्क मोकळे केल्याचे तपासात आढळले. पोलिसांनी भंगार विक्रेत्याकडून पोकलॅण्ड मशीनचे स्पेअर पार्ट व इंजिन, 10 लाख रुपयांचा ट्रक, चोरीसाठी वापरलेली सहा लाखांची कार मिळून 19 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक राकेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेरचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, हवालदार किशोर पाटील, सुनील हटकर, रवींद्र पाटील, दीपक माळी, कैलास शिंदे, भूषण पाटील यांच्या पथकाने केली.