14 लाखांत घर, 80 लाख नोकर्‍या!

0

मुंबई : सर्वसामान्यांना परवडणारे 14 ते 15 लाखांत घर, तब्बल 80 लाख नोकर्‍या आणि दरडोई मोकळी जागा चार पटींनी वाढवणारा बहुचर्चित आणि ऐतिहासिक विकास आराखडा महापालिका सभागृहात सोमवारी मध्यरात्री मंजूर झाला. तब्बल 108 सदस्यांनी यावर आपले विचार मांडून सूचना-सुधारणा सुचवल्या. त्यामुळे 2014 ते 2034 पर्यंतच्या या विकास आराखड्यावर रात्री 1.33 पर्यंत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर आराखड्याला मंजुरी मिळाली. मुंबईचा सर्वांगिण विकास करणारा हा आराखडा आता राज्य सरकारडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.

मुंबईच्या महत्त्वाकांशी विकास आराखड्याबाबत नगरसेवक, गटनेत्यांनी मांडलेल्या हरकती-सूचनांवर स्पष्टिकरण देताना पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संपूर्ण विकास आराखड्याबाबत माहिती दिली. विकास आराखड्यात दाखवण्यात आलेल्या परवडणार्‍या घरांबाबत बोलताना ते म्हणाले की, मीठागरांसारख्या नॉन डेव्हलपमेंट झोनमध्ये विकास आराखड्यात दाखवण्यात आलेल्या आरक्षित जागेवर ही परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत दरडोई मुंबईत उपलब्ध असणारी 1 चौ.मी. असलेली मोकळी जागा विकास आराखड्यात 4 चौ. मी. होणार आहे. स्किल सेंटरमुळे लाखो रोजगार निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.

ही घरे महापालिकेला ङ्गझिरो कॉस्टफमध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे ज्यांना घरे नाहीत अशा गोरगरीबांना ही घरे 14 ते 15 लाखांत उपलब्ध करता येतील. हे पैसेदेखील त्या त्या विभागात नागरी सुविधा देण्यासाठी वापरण्यात येणार आहे. -आयुक्त अजोय मेहता यांनी स्पष्ट केले.

न्युमॅरिस्क
14 लाख कोटी विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी लागणार
5 हजार कोटी प्रत्येक बजेटमध्ये तरतूद करणार
2 हजार कोटींची तरतूद यावर्षीच्या बजेटमध्ये

विकास आराखड्याची वैशिष्ट्ये
पार्किंगसाठी खासगी संस्थांचे सहाय्य घेणार
मॅनग्रोव्ह नॅचरल एरिया जाहीर करणार, त्या ठिकाणी कधीही, कोणताही विकास होणार नाही
प्रत्येक वॉर्डमध्ये प्रस्थापितांसाठी राखीव जागा
मुंबईचे वैभव असलेल्या हेरिटेज वास्तूंना धक्का लावणार नाही
ठाणे खाडीत 14.96 हेक्टर जागा उपलब्ध होणार, ही जागा नॅचरल एरिया म्हणून आरक्षित ठेवणार

अशी होणार अंमलबजावणी
विकास आराखड्यावर झालेल्या चर्चेप्रसंगी तब्बल 269 हरकती-सूचना मांडण्यात आल्या. या हरकती सूचनांचा समावेश करून हा आराखडा राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल. राज्य सरकारकडून पुन्हा या विकास आराखड्यावर हरकती-सूचना मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर आवश्यक ते बदल करून हा विकास आराखडा महापालिकेकडे अंमलबजावणीसाठी पाठवण्यात येणार आहे.

आरेत कारशेड ऐवजी गोशाळा बांधा
आरेतील कारशेडला शिवसेनेचा विरोध आहे आणि राहणार, असे सांगत सभागृहनेते यशवंत जाधव यांनी या कारशेडच्या जागेवर गोशाळा बांधली तर आम्ही आम्ही तुमच्यासोबत राहू, असे सांगितले. पण हे माझे वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच विकास आराखड्यानुसार बांधण्यात येणारी परवडणारी घरे गिरणी कामगारांना द्या अशी मागणी शिवसेनेतर्फे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली. विकास आराखड्यात पुरातन वास्तू आणि ठिकाणांचा समावेश नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.