14 व्या वित्त आयोगातील अपहार भोवला : कोरपावलीच्या ततत्कालीन सरपंचांना अटक

0

पसार होण्याच्या बेतात असताना आवळल्या यावल पोलिसांनी मुसक्या

यावल- तालुक्यातील कोरपावली येथे 14 व्या वित्त आयोगाच्या निधीत अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या कोरपावली येथील तत्कालीन सरपंच सविता संदीप जावळे यांना बुधवारी सायंकाळी अटक करण्यात आली. त्या आपल्या पतीसह मुंबई येथे पसार होण्याच्या बेतात असताना पोलिसांना मिळाल्याने त्यांनी एसटी बसचा पाठलाग करून सविता यांना अटक केली. कोरपावली ग्रामपंचायतीत आठ लाख 46 हजार 500 रूपयांची शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी तत्कालीन सरपंच सविता संदीप जावळे व ग्रामसेवक सुनील चिंतामण पाटील यांच्य विरूध्द 20 नोव्हेंबर 2017 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खंडपीठातही मिळाला नाही दिलासा
एप्रिल 2016 ते जुन 2016 या कालावधीत त्यांनी शासनाच्या या निधीचा स्वत:च्या फायद्याकरीता वापर केला म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय तुळशिराम मोरे यांनी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अटक टाळण्यासाठी दोन्ही आरोपींनी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व नंतर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. मागील आठ महिन्यांपासून ते अटकपूर्व जामीन मिळवण्याच्या तयारीत होते मात्र दोन्ही ठिकाणी त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यामुळे अटक टाळण्यासाठी सविता या मुंबईला पसार होण्याच्या बेतात होत्या मात्र पोलिसांना याची माहिती मिळाल्याने बुधवारी मोठ्या शिताफीने सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे, हवालदार जाकीर सैय्यद, सतीश भोई, राहुल चौधरी, महिला पोलिस कर्मचारी सुशीला भिलाला, ज्योेती खराटे या पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली. नंतर यावल ग्रामिण रूग्णालयात त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. गुरूवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास सपोनि योगेश तांदळे करीत आहे.

पाठलाग करून केली अटक
बुधवारी सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश तांदळे हे कोरपावली येथे पथकासह सविता जावळे यांना अटकेकरीता गेले होते. मात्र, त्या तेथुन पसार झाल्या होत्या. सांयकाळी साडेपाच वाजता त्या एका एसटी बसद्वारे त्यांच्या पतीसह मुंबईकडे जाणार असल्याचे पोलिसांना समजले. तेव्हा पोलिसांनी एस.टी.बसचा थेट भुसावळ तापी पुलापर्यंत पाठलाग केला व बस थांबवून त्यांना अटक केली.

दुसर्‍या आरोपीच्या शोधात पथक रवाना
या गुन्ह्यातील दुसरा संशयीत आरोपी ग्रामसेवक सुनील चिंतामण पाटील हा सध्या धरणगाव तालुक्यात सेवेत आहे. त्यास देखील अटक करण्याकरीता यावल पोेलिसांचे एक विशेष पथक रवाना झाले आहे.

अपहार प्रकरणी अशी करण्यात आली होती कारवाई
वित्त आयोगातील रक्कम किर्द बुकात नोंद न करता परस्पर खर्च केली म्हणून सरपंच सविता जावळे यांना नाशिक विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी 16 सप्टेंबर 2017 रोजी सरपंच पदासह सदस्य पदावरून अपात्र ठरविले होते. याच प्रकरणात ग्रामसेवक सुनील चिंतामण पाटील यांनादेखील 21 सप्टेंबर 2016 रोजी निलंबित करण्यात आले होते.