मुंबई । शेतकरी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय सुकाणू समितीने घेतल्याचे जाहीर केले होते. आज 14 ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यभर चक्का जाम सत्याग्रह करण्यात येणार आहे. तसेच स्वातंत्र्यदिनी जिल्ह्याच्या ठिकाणी होणारे ध्वजारोहण करण्यापासून पालकमंत्र्यांना रोखण्यात येणार आहे. जिल्ह्यातील पालकमंत्री कर्जमाफीची फसवी घोषणा करणार्या राज्य सरकारचे प्रतिनिधी असल्याने त्यांच्याऐवजी शेतकर्यांच्या हाताने जिल्ह्यात ध्वजारोहण व्हावे, असे आवाहनही सुकाणू समितीने केले आहे. मुंबईत शनिवारी सुकाणू समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत चक्का जाम आंदोलनाचा निर्णय जाहीर केला होता. दरम्यान, काश्मीरात अकोल्याचे सुपूत्र सुमेध गवई यांना वीरमरण आल्याने सुकाणूचे अकोल्यातील आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
पुन्हा निर्णायक लढ्याचा निर्धार
सरकारचे निकष आणि जाहीर केलेल्या कर्जमाफीला सुकाणू समितीचा विरोध आहे. त्यामुळे वारंवार मागणी करुनही सरकारने गांभीर्याने विचार न केल्यामुळे सुकाणू समितीने राज्यव्यापी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हे आंदोलन आज होत आहे. सुकाणू समितीच्या संप व आंदोलनामुळे सरकारला शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी लागली. मात्र, घोषणा करताना सरकारने अनेक जाचक अटी व शर्ती लावल्यामुळे लाखों शेतकरी कर्जमाफीपासून वंचित रहात आहेत. कर्जमाफी व पीकविम्याबाबतही सरकार जाणीवपूर्वक ऑनलाईनचा गोंधळ घालत आहे. शेतीमालाचे भाव सातत्याने पाडले जात आहेत. शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचे प्रश्न जाणीवपूर्वक जटील केले जात आहेत, असे आरोप शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने केले असून पुन्हा निर्णायक लढ्याचा निर्धार केला आहे.
केवळ घोषणा नको अंमलबजावणी करा
महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने यापूर्वी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला वाढता प्रतिसाद मिळाल्याने, कर्जमाफीबाबत ताठर भूमिका घेणार्या फडणवीस सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली. मात्र, कर्जमाफी निर्णयाची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्ज योजनेचे ऑनलाइन फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळेच सुकाणू समितीने पुन्हा तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसल्याची माहिती समितीचे नेते कॉ. अजित नवले, रघुनाथदादा पाटील, आ. बच्चू कडू, किशोर ढमाले आदींनी दिली.