नवी दिल्ली। केंद्रीय लोकसेवा आयोगाचा म्हणजेच यूपीएससी परीक्षेचा 2016 वर्षाचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या यूपीएससीच्या मुख्य परीक्षेत नंदिनी के आर ही तरुणी देशात पहिली आली असून अनमोल शेरसिंह बेदी याने दुसरा क्रमांक पटकावला आहे, तर गोपाळकृष्ण रोनंकी तिसर्या क्रमांकावर आहे. पुण्याची विश्वांजली गायकवाड देशात अकरावी आली आहे. पण यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरच्या 14 उमेदवारांनी ही परीक्षा पास केली आहे. या पास झालेल्या उमेदवारामध्ये 31 वर्षांचे बिलाल मोहिउद्दीन यांनी टॉप टेनमध्ये जागा मिळवली आहे. सध्या त्यांची पोस्टिंग लखनऊ इथे आहे. 2012 मध्ये त्यांनी काश्मीर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह परीक्षा पास करून त्यात 15 वा क्रमांक मिळवला होता. त्यानंतर ते इंडियन फॉरेस्ट सर्विससोबत जोडले गेले. ‘हा माझा चौथा प्रयत्न होता. जम्मू काश्मीरमध्ये काम करण्याची संधी मिळावी, अशी माझी इच्छा आहे. आपल्या लोकांची सेवा करायला हवी असे वाटते.
काश्मीरच्या प्रशासकीय सेवेतून निवृत्त झालेले माझे वडील माझे प्रेरणास्थान आहेत,’ असे मोहिदिनने सांगितलं. मोहिदिनची बहिण शिक्षिका आहे. त्याचा एक भाऊ बोस्टनमध्ये डॉक्टर म्हणून तर दुसरा भाऊ राज्याच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतो.
यासोबतच श्रीनगरमधल्या बेमिना परिसरातील 30 वर्षीय दंतवैद्य फखरुद्दीन यांनीही यूपीएससी परीक्षा पास केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी कोणताही कोचिंग क्लास न लावता अनेक वर्षे अभ्यास करून ही परीक्षा पास केली आहे. रोजगाराच्या संधींमध्ये घट झाल्याने यूपीएससीची परीक्षा देणार्या तरुणांच्या संख्येत वाढ झाल्याचे फाकुरुद्दीन याने सांगीतले. मागील वर्षी जम्मू काश्मीरमधील 12 जण यूपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले होते.