14 शहरात रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानावर आधारीत नवीन वीज मीटर

0

जळगाव परिमंडळात पुर्नरचित गतिमान ऊर्जा विकास व सुधारणा कार्यक्रमांतर्गत काम प्रगतीपथावर ; 21 हजार मीटर बसविले

जळगाव- महावितरणच्या जळगाव परिमंडळात पुर्नरचित गतिमान ऊर्जा विकास व सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत समाविष्ट 14 शहरात रेडिओ फ्रिव्केन्सी तंत्रज्ञानावर आधारीत नवीन वीज मीटर बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ग्राहकांना वीजवापरानुसार अचुक व वेळेत बिले मिळावित, हा नवीन मीटरप्रणालीचा हेतु आहे. सिंगल फेज लघुदाब वर्गवारीतील 3 लक्ष 6 हजार 37 वीज ग्राहकांना हे नवीन मीटर बसविले जाणार आहेत. तेंव्हा ग्राहकांच्या हिताचे नवीन वीज मीटर बसविण्याचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांनी केले आहे.

परिमंडळातील 14 शहरांचा समावेश
पुर्नरचित गतिमान ऊर्जा विकास व सुधारणा कार्यक्रमात जळगांव जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा, अमळनेर, धरणगाव, एरंडोल, चोपडा, यावल या नऊ शहरांचा, धुळे जिल्ह्यातील धुळे ,शिरपुर व दोंडाईचा या तीन तर नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा या दोन शहरांचा समावेश आहे.मीटरच्या उपलब्धतेनुसार मीटर बदलण्याचे काम प्रगतीपथावर आहे. एप्रिल अखेर धरणगावात 2009, भुसावळ 16504, पारोळा 2461 व चोपडा 357 नवीन वीज मीटर बसविण्यात आले आहेत.

तीन लक्ष सहा हजार ग्राहकांना नवीन मीटर
जळगाव जिल्ह्यातील नऊ शहरात 1 लक्ष 51 हजार 282 , धुळे जिल्ह्यातील 1 लक्ष 14 हजार 827 तर नंदुरबार जिल्ह्यातील 39 हजार 928 सिंगल फेज लघुदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांना हे नवीन मीटर बसविले जाणार आहेत.

नवीन वीज मीटरचे फायदे
रेडिओ फ्रिव्केन्सी तंत्रज्ञानावर आधारीत नवीन वीज मीटरमुळे मानवी हस्तक्षेप रहित मीटर रिडींग घेतले जाणार असल्याने ग्राहकांच्या वीजवापराची अचुक व वेळेवर नोंद होणार आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीजबिलाच्या समस्या असणार नाहीत.