14 हजार 137 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त

0

 मुंबई । केंद्राच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ (ग्रामीण) अंतर्गत राज्यात 14 हजार 137 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली आहे. राज्यातील ग्रामीण भाग हागणदारीमुक्त करण्यासंदर्भात अमरीश पटेल, आनंद पाटील यांनी प्रश्‍न उपस्थित केला होता.

ग्रामीण भाग हागणदारीमुक्त करण्यासाठी उघड्यावर शौचास बसण्याच्या सवयींना प्रतिबंध घालण्यासाठी ग्रामपंचायत कायद्यात सुधारणा करण्याची गरज असल्याची बाब निदर्शनास आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘स्वच्छ भारत मिशन’  ग्रामीण अंतर्गत जिल्हास्तरीय यंत्रणेमार्फत उघड्यावर शौचविधीस जाण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी व शौचालय बांधण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. गुड मॉर्निंग पथक, गृहभेटी, पोलीस अधिनियमानुसार कारवाई, महिला बचत गट, शालेय विद्यार्थी यांच्यामार्फत शौचालय बांधण्यासाठी व वापरासाठी उपक्रम राबवणे व गवंडी प्रशिक्षण या पाच उपाययोजनांचा समावेश असल्याची माहिती लोणीकर यांनी दिली.