१४ ऑगस्टला चांद्रयान चंद्राच्या दिशेने मार्गस्थ होणार: इस्त्रो

0

नवी दिल्ली: संपूर्ण भारतीय बनावटीचे महत्त्वाकांक्षी चांद्रयान-२चे प्रक्षेपण २२ जुलैला करण्यात आले. दरम्यान आता चांद्रयान-2 ने पृथ्वीची कक्षा ओलांडून १४ ऑगस्टला चंद्राच्या दिशेने मार्गक्रमण करेल, अशी माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी दिली. चांद्रयान-२चे प्रक्षेपण झाल्यानंतर त्याच्या प्रवासाबाबत इस्रोकडून वेळोवेळी माहिती दिली जात आहे. इस्रोचे सर्वात शक्तीशाली रॉकेट जीएसएलव्ही मार्क ३च्या मदतीने हे प्रक्षेपण झाले होते. या यानाचे तीन भाग आहेत ऑर्बिटर, लैंडर (विक्रम) आणि रोवर (प्रज्ञान).

१४ ऑगस्टच्या पहाटे ३.३० मिनिटांनी चांद्रयान-२ची कक्षा बदलण्यात येणार आहे. त्यानुसार, हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर जाईल, याला ट्रान्स लुनार इंजेक्शन असे संबोधतात. त्यानंतर हे यान चंद्राच्या दिशेने रवाना होईल. त्यानंतर ते चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेतून जाईल. या प्रक्रियेनंतर पुढील ८ दिवसांत म्हणजेच २० ऑगस्ट रोजी चंद्राजवळ पोहोचेल, त्यानंतर यानाची कक्षा पुन्हा बदलण्यात येईल. त्यानंतर अखेर ७ सप्टेंबर रोजी चांद्रयान-२ चंद्रावर उतरेल. यापूर्वी ६ ऑगस्ट रोजी चांद्रयान-२च्या कक्षेत पाचव्यांदा बदल करण्यात आला होता. इस्रोने दुपारी ३ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-२च्या कक्षेत वाढ केली होती.