जळगाव । शासनाने डिजीटल शिक्षणावर अधिक भर दिला आहे. आधुनिक युगाकडे वाटचाल सुरु असून डिजीटल शिक्षण ही काळाची गरज असल्याने 1 ली ते 4 थीचे सर्व अभ्याससाहित्य डिजीटल करण्यावर भर असल्याची माहिती जि.प.चे सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी पत्रकारांना दिली. शालेय अभ्याससाहित्यावर मोठ्या प्रमाणात खर्च केले जाते. हे खर्च वाचवता येण्यासारखे असून सर्व अभ्याससाहित्य डिजीटल उपलब्ध झाल्यास दरवर्षी नवीन अभ्याससाहित्य खरेदी करण्याची गरज नाही. पुस्तकी अभ्यासक्रमाचे डिजीटल अभ्यासक्रमात रुपांतर करण्यात येणार आहे. 15 ऑगस्ट पर्यत सर्वच अभ्याससाहित्य डिजीटल स्वरुपात उलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात येत असून त्यासंबंधी शिक्षण विभागाला सुचना देण्यात आले आहे.
सहाशे शिक्षक नेमणार
पुस्तकी स्वरुपात असलेले अभ्याससाहित्य डिजीटल करण्यासाठी जिल्ह्याभरातील निवडक सहाशे शिक्षकांची नेमणुक करण्यात येणार आहे. त्यांच्यावर डिजीटल अभ्याससाहित्य तयार करण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. शिक्षकांना अगोदर अभ्यास करुन पीपीटी, तसेच पीडीएफ फाईल तयार करावे लागणार आहे. एकदा तयार केलेले डिजीटल साहित्य वर्षानुवर्ष उपयोगात येणार आहे.
दिल्ली येथील पाठ्यपुस्तक वापरणार
विविध विषयांचे डिजीटल अभ्यासक्रम तयार करण्यासाठी दिल्ली येथील सेतू माधवराव पगडी प्रकाशनचे पाठ्यपुस्तक वापरण्यात येणार आहे. या प्रकाशनाचे पाठ्यपुस्तक चांगल्या दर्जाचे असल्याने ते पुस्तक संदर्भासाठी वापरण्यात येणार आहे. स्कॉलर्शिप, मोफत अभ्यासक्रमावर अधिक भर देण्याचे नियोजन सुरु आहे.