15 ऑगस्टपासून जिल्हयात ऑनलाईन 7/12 मिळणार

0

नंदुरबार। 1 ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्रात महसूल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने महाराष्ट्र शासनाचा महत्वाकांक्षी ऑनलाईन संगणकीकृत 7/12 कार्यक्रमाचा शुभांरभ नंदुरबार जिल्ह्यात करण्यात येत आहे. 7/12 संगणकीकरणाच्या कामात नंदुरबार जिल्हा सद्यस्थितीत नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्हयात एकूण 36 मंडळ भागात 219 साझा तर एकूण 885 महसूली गावे आहेत. या सर्व गावामध्ये संगणकीकृत 7/12चे चावडी वाचन करण्यात आले आहे. त्यातील आढळून आलेल्या चुका दुरुस्त करण्याचे काम व त्याचबरोबर खाता मस्टर दुरुस्ती, 1 ते 26 अहवाल निरंक करणे इ. कामे अंतिम टप्यात आहेत.

पालकमंत्री रावल यांच्याहस्ते वितरण
1 ऑगस्टपासून 15 ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रम घेवून तलाठी सझा, तहसिल, उपविभाग त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालय या विविध स्तरावर 7/12 संगणकीकरणाबाबत मोठया प्रमाणात जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 15 ऑगस्ट 2017 रोजी पालकमंत्री ना. जयकुमार रावल यांच्याहस्ते संगणकीकृत 7/12 वितरणाचा शुभांरभ केला जाणार आहे. पुढील 15 दिवसामध्ये सर्व तलाठी , मंडळ अधिकारी यांनी आपापल्या सझयामध्ये 7/12 संगणकीकरणाला व्यापक प्रमाणामध्ये प्रसिध्दी दयावी तसेच लोकांच्या अडीअडचणी सोडाविण्यासाठी मुख्यालयी उपलब्ध राहावे. तरी सर्व नागरीकांनी संगणकीकृत ऑनलाईन 7/12 घ्यावा, आपल्या अडचणीचे निरसन करुन घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.