भुसावळ : रेल्वेच्या चारचाकी वाहन पार्किंगमध्ये अवघ्या 15 मिनिटांसाठी 30 रुपयांची आकारणी करण्यात आल्यानंतर डीआरयूसीसीचे सदस्य तथा भाजयुमोचे शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी यांनी रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करताच संबंधित ठेकेदाराला पाच हजार रुपये दंड करण्यात आला.
तक्रारीची तातडीने दखल
शहरातील रेल्वे स्थानकावर उत्तर व दक्षिण बाजूने दुचाकी व चारचाकी वाहन पार्किंग आहे. मात्र, येथे लूट होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. दोन दिवसांपूर्वी डीआरयूसीसीचे सदस्य अनिरुद्ध कुलकर्णी स्थानकावर गेले होते. अवघ्या 15 मिनिटांत ते परतले. या कालावधीसाठी रेल्वे पार्किंगवरील कामगाराने त्यांच्याकडून 30 रुपयांची मागणी केली. पैस भरल्यावर त्यांना पावती दिली. मात्र 15 रुपयांऐवजी दुप्पट 30 रुपयांची आकारणी होत असल्याने कुलकर्णी यांनी डीआरएम कार्यालयात तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने संबंधीत ठेकेदारावर पाच हजार रुपयांचा दंड केला आहे. यापूर्वी देखील संबंधीत ठेकेदाराला तीन वेळा दंड झाल्याची माहिती रेल्वे अधिकार्यांनी कुलकर्णी यांना दिली. पुन्हा तक्रारी प्राप्त झाल्यास ठेका रद्द केला जाईल, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
दरपत्रक लावावे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे
पार्किंग ठेकेदारांवर रेल्वे प्रशासनाचे नियंत्रण असायला हवे. पार्किंग शुल्काचे दरपत्रक तसेच सीसीटीव्ही कॅमेर्यांची निगराणी या ठिकाणी असली पाहिजे. तेव्हाच हे प्रकार थांबतील, असे डीआरयूसीसी सदस्य अनिरुद्ध कुलकर्णी म्हणाले.
रेल्वे स्थानकावर अक्षरक्षः लूट
रेल्वे स्थानकावर काही विक्रेत्यांकडून लूट सुरू आहे. दिवसभरात शेकडो गाड्या जंक्शन थांबत असल्याने त्याची संधी साधून काही विक्रेते शीतपेयांसह पाण्याची बाटली व अन्य पदार्थांची विक्री करताना जादा दर आकारत असल्याने रेल्वेच्या वाणिज्य विभागासह सुरक्षा यंत्रणांनी दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.