15 एप्रिलपर्यंत पूर्ण करणार रुंदीकरण

0

आयुक्त गित्ते यांचे आश्‍वासन; वाघोलीत विविध कामांची पाहणी

वाघोली : पीएमआरडीएच्या वतीने पुणे-नगर महामार्गावर वाघोलीत करण्यात येणारे 1300 मीटर रस्ता व चौक रुंदीकरण कामातील सर्व त्रुटी दूर करून 15 एप्रिल पर्यंत काम पूर्ण करण्यात येईल, असे आश्‍वासन पीएमआरडीए आयुक्त किरण गित्ते यांनी ग्रामस्थांना दिले.

वाघोली ग्रामपंचायत निधीतून नगर रोड ते सातव कॉलेज (प्रिस्टीन सोसायटी) पर्यंत होणार्‍या रस्त्याचे भूमिपूजन आमदार बाबुराव पाचर्णे व पीएमआरडीए आयुक्त किरण गित्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी आमदार बाबुराव पाचर्णे व माजी जि. प. सदस्य रामभाऊ यांच्या पाठपुराव्याने वाघोलीत चालू असलेली विविध विकासकामे व समस्यांची पाहणी केली. त्यानंतर वाघोली ग्रामपंचायतीमध्ये आयोजित आढावा बैठकीत किरण गित्ते बोलत होते. वाघोली व परिसराच्या विविध कामासाठी निधी देऊन सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. आमदार पाचर्णे यांच्यासह किरण गित्ते यांनी वाघेश्‍वर मंदिर सीमाभिंत, भैरवनाथ तळे, भावडी फाटा-लोणीकंद रस्ता, बकोरी रस्ता व पीएमआरडीए करीत असलेल्या पुणे-नगर रस्त्याची पाहणी केली.

कचर्‍याच्या गाड्या देण्याचे आश्‍वासन

वाघोली येथील बांधकाम व्यावसायिकांनी नैसर्गिक ओढे-नाल्यांवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारी पीएमआरडीएकडे करण्यात आल्या असून त्यानुसार जलसंपदा विभागाकडून ओढे-नाल्यांचे नकाशे मागविण्यात आले आहे. माहिती मिळाल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे किरण गित्ते यांनी ग्रामस्थांशी बोलताना सांगितले. ग्रामपंचायतीच्या वतीने गित्ते यांना लोणीकंदसाठी घंटागाडी, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प व घनकचरा प्रकल्पासाठी निधी देण्याचे लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी लोणीकंदसाठी दोन कचरा गाड्या देण्याचे आश्‍वासन गित्ते यांनी दिले असल्याचे उपसरपंच रवींद्र कंद यांनी सांगितले.

महामार्गाचे रुंदीकरण

पुणे-नगर महामार्गावर महावितरणचे खांब हटवणे जाणार असून भावडीफाटा ते लोणीकंद रस्त्याच्या कामास सुरुवात करून लोहगावला जाणार्‍या रस्त्याचे देखील काम पीएमआरडीएच्या वतीने करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे गित्ते यांनी सांगितले. वाघोली ते शिक्रापूरपर्यंत महामार्ग रुंदीकरण, अग्निशमन दल, पाणी पुरवठा योजना, बायपास अंतर्गत रस्ता निधी अशा विविध 400 कोटींच्या कामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्याचे नियोजन आहे. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठीदेखील प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाचर्णे यांनी सांगितले.

शेतकर्‍यांना टीडीआर देणार

बकोरी रस्त्याचे 300 मीटर रुंदीकरण रखडले असल्याने मोठ्याप्रमाणात नागरिकांना समस्या जाणवत आहेत. सदरचा रस्ता रुंदीकरण करण्यासाठी स्थानिक शेतकर्‍यांना टीडीआरच्या स्वरूपात मोबदला देण्यास पीएमआरडीए तयार आहे. त्यासाठी स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ व पीएमआरडीएची संयुक्त बैठक बोलावून रुंदीकरणाची समस्या सोडविण्याचे प्रयत्न करू, असे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.