15 टक्के भागात दुबार पेरणी!

0

मुंबई: राज्याच्या बहुतांश भागात पावसाने अचानक दडी मारल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. जून महिन्यात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने 40 टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या होत्या. मात्र पावसाने त्यानंतर मारलेल्या दडीमुळे राज्यातल्या बहुतांश भागात दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. पाऊस 2- 3 दिवसात नाही आला तर राज्यभरात 15 टक्के क्षेत्रात दुबार पेरणी करावी लागणार असल्याची भीती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी व्यक्त केली आहे. दुबार पेरणीसाठी सरकार देखील सज्ज झाले असून सरकारकडून बियाणांची व्यवस्था केली असल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी जनशक्तिशी बोलताना दिली.

40 टक्के पेरणी; 15 टक्क्यांवर सावट
प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यात पावसाने दडी मारल्याने सुरवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. पाऊस वेळेवर न झाल्याने पिके जाळून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ४० टक्के शेतकऱ्यांनी राज्यात पेरणी केली आहे. आणखी तीन-चार दिवस पाऊस आला नाही तर दुबार पेरणी करावीच लागणार आहे. यासाठी सरकारने देखील तयारी केली आहे. बियाणांची व्यवस्था केली असल्याची माहिती कृषिमंत्र्यांनी दिली.

अधिकारी घेत आहेत माहिती
मंगळवारपासून कृषी विभागाचे अधिकारी पेरणी झालेल्या भागात दौरा करत आहेत. असून त्या भागाचा पंचनामा देखील करत आहेत. यावरून दुबार पेरणीसाठी आवश्यक बियाणे पुरवण्याची व्यवस्था केली जाईल असे कृषिमंत्री फुंडकर यांनी सांगितले. राज्याच्या 40 टक्के भागात अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे फुंडकर यांनी सांगितले. यातील जवळपास 15 टक्के भागात दुबार पेरणी करावी लागणार असल्याची भीती कृषिमंत्र्यांनी व्यक्त केली. दुबार पेरणीयोग्य परिस्थिती निर्माण झाल्याचा अहवाल देतील त्या-त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना ताबडतोब मोफत बियाणे पुरवण्यात येणार असल्याचे फुंडकर यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी आतापर्यंत केलेली पेरणी उलटण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणांची व्यवस्था आम्ही केली आहे. आमच्या विभागाचे अधिकारी महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. पंचनामे आल्यावर बियाणे वितरण केले जाईल.
पांडुरंग फुंडकर,
कृषिमंत्री