15 टक्क्यांपेक्षा कमी दराच्या निविदा रद्द करा

0

पुणे । शहरातील विकासकामांचा दर्जा सुधारण्यासाठी कामाचे कंत्राट पदरी पाडून घेण्यासाठी पूर्वगणनपत्रकापेक्षा 15 टक्क्यांहून कमी दराने भरलेल्या निविदा रद्द करण्यात याव्या, अशा मागणीचा प्रस्ताव महापालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी स्थायी समितीपुढे ठेवला आहे.

महापालिकेतर्फे शहरात रस्ते, पूल, इमारतींची उभारणी, जलवाहिन्या टाकणे, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन आदी विकासकामे केली जातात. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येते. त्यासाठी दरवर्षी बाजारभावांशी सुसंगत कामाचे दर (डीएसआर-डिव्हिजनल शेड्युल्ड ऑफ रेट) ठरविला जातो. त्यानुसार विकासकामे करणे बंधनकारक आहे. अंदाजित खर्चापेक्षा कमी दराने निविदा भरणार्‍या ठेकेदारांनाच विकासकामांचे कंत्राट दिले जाते. निविदा प्रक्रियेमध्ये स्पर्धा होत असल्याने बर्‍याच वेळा कामांचे कंत्राट पदरी पाडून घेण्यासाठी ठेकेदार कामाच्या पूर्वगणनपत्रकापेक्षा अत्यंत कमी दराने निविदा भरतात. अशा निविदा अनेकदा मंजूरही केल्या जातात. मात्र, दरम्यानच्या काळात कामांसाठी लागणार्‍या बांधकाम साहित्यांचे वाढलेले दर आणि इतर खर्चामुळे संबंधित विकासकामे पूर्ण करणे ठेकेदाराला परवडेनासे होते. त्यामुळे अनेकदा ठेकेदार कामे अर्धवट सोडून देतात. अनेकदा कमीत कमी खर्च करून अत्यंत निकृष्ट पद्धतीने विकासकामे पूर्ण केली जातात. त्याचा परिणाम कामाच्या दर्जा आणि गुणवत्तेवर होतो. निविदा प्रक्रियेदरम्यान बहुतांश ठेकेदार संगनमत करून आपल्या तुंबड्या भरत असल्याने महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसतो. त्यामुळे पूर्वगणनपत्रकाहून 15 टक्क्यांपेक्षा कमी दराने निविदा भरता येणार नाही, अशी तरतूद करण्यात यावी, तसेच त्याहून कमी दराने भरण्यात आलेल्या निविदा रद्द करण्यात याव्या, अशा मागणीचा प्रस्ताव राष्ट्रवादीचे योगेश ससाणे आणि अ‍ॅड. भैय्यासाहेब जाधव यांनी स्थायी समितीपुढे ठेवला आहे.