मुंबई : राज्य शासनाने मुंबईसह राज्यभरात लागू केलेल्या प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी एकीकडे मुंबई महापालिकेने पावले उचलली असताना दुसरीकडे सन 2012 पासून गोळा केलेल्या तब्बल 15 टन प्लास्टिकच्या पिशव्या गोडाऊनमध्ये पडून असल्याचे आढळून आले आहे. तब्बल सहा वर्षे गोडाऊनमध्ये पडून असलेल्या या पिशव्यांचे रिसायकलिंग करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. मात्र या रिसायकलिंगसाठी प्लास्टिकबंदीपर्यंतची वाट बघावी लागली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सरकारने यंदाच्या गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिकबंदी लागू केली असून, नागरिकांमध्ये बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आला होता. ही मुदत 22 जूनला संपत असून 23 जूनपासून प्रत्यक्ष दंडात्मक कारवाईला सुरुवात होणार आहे. प्लास्टिकबंदी जाहीर होण्यापूर्वी मुंबईत अनेक वर्षांपासून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आहे. पालिकेचे परवाना विभागाचे कर्मचारी मंडया, दुकाने व उत्पादकांच्या कारखान्यात अचानक छापे टाकून या पिशव्या जप्त करण्याची कारवाई करतात. सन 2012 पासून 15 टनाहून अधिक 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या पालिकेने जप्त करून संबंधितांकडून कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
पालिकेने जप्त केलेल्या या पिशव्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आल्या होत्या. जप्त केलेल्या पिशव्यांचे रिसायकलिंग करण्याची पद्धत आहे. मात्र मागील सहा वर्षांपासून या पिशव्यांना रिसायकलिंगसाठी मुहूर्तच मिळाला नसल्याची बाब उजेडात आली आहे.