15 दिवसांत राज्यातील केवळ 35 टक्के रस्ते झालेत खड्डेमुक्त

0

मुंबई । राज्यामध्ये रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांमुळे सरकारला प्रचंड रोषाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांची दयनीय अवस्था असल्याने टिकेचा धनी झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आता खड्डेमुक्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. 15 डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा करत वॉर रूम स्थापन केल्यानंतर 15 दिवसांनी राज्यातील रस्त्यांवर असलेले सरासरी 35 टक्के खड्डे बुजविले आहे. यात सर्वाधिक खड्डे बुजविण्यात मुंबई विभागात तर सर्वाधिक कमी खड्डे औरंगाबाद विभागात बुजविले गेले आहे. औरंगाबाद आणि अमरावती विभागात मजुरांची उपलब्धता नसल्याने कामाला गती येत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र या समस्येवर मात करत त्या विभागात देखील काम वेळेवर पूर्ण होईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली आहे.

राज्यात 3.50 लाख किमी रस्ते राज्यात आहेत. यापैकी 97 हजार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. 3 वर्षाआधी 5 हजार किमी राष्ट्रीय महामार्ग होते. राज्य सरकारने केंद्राकडे प्रयत्न करून 22 हजार किलोमीटर रस्ते राष्ट्रीय महामार्गात शिफ्ट केले आहेत. या 22 हजार किलोमीटरच्या रस्त्यासाठी 1 लाख 6 हजार कोटी रुपये केंद्राकडून मिळणार आहेत. संपूर्ण राज्यातील खड्डेमुक्तीसाठी 1 लाख कोटींचा निधी आवश्यक आहे मात्र बांधकाम विभागाकडे फक्त 1200 कोटींचे बजेट आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ते वाढवून 4 हजार कोटी करून घेतले असून त्यातून खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे.

वॉररूममधून घेतला जातोय तासागणिक आढावा
गेल्या 15 दिवसांत राज्यात सरासरी 35 टक्के खड्डेमुक्त झाले आहे. यात मुंबई विभाग 50.26 टक्के, पुणे विभाग 39.54, नाशिक विभाग 37.65, औरंगाबाद विभाग 26.40, अमरावती विभाग 27.28 टक्के, तर नागपूर विभागात 40.45 टक्के खड्डे मुक्त रस्ते केले आहे. त्यामुळे येत्या 15 डिसेंबर रोजी निश्‍चित 100 टक्के खड्डे मुक्त महाराष्ट्र होणार असल्याचे या विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.