तळोदा । तळोदा पालिकेची आज विशेष सभा पालिकेच्या सभागृहात पार पडली असून या विशेष सभेत विविध विकास कामावर चर्चा होऊन विषय मंजूर करण्यात आलेत. मात्र अवघ्या 15 दिवसाच्या अंतरात 2 विशेष सभा घेण्यात आल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नगर पालिकेच्या सभागृहात आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी नगराध्यक्षा रत्ना सुभाष चौधरी, उपनगराध्यक्षा रुखसना बी. अब्बास अली, काँगेसचे गटनेते भरत माळी, नगरसेवक गौरव वाणी, संजय माळी, सतीवन पाडवी, पंकज राणे, अपर्णा माळी, सिंधू पिपळे, कांता पाडवी, सुनंदा पाडवी, सुनीता वाणी, अजय परदेशी आणि शिवसेनेच्या निर्मला कुलकर्णी आदी उपस्थित होते.
सभेत मांडले विविध विषय
या विशेष सभेत शहरातील विविध विकास कामावर चर्चा करण्यात आली यात खर्डी नदीवर उत्तरेस सरंक्षक भिंत तयार करणे, कल्पना टॉकीजचा परिसरात गटार बांधकाम व रस्ता काँक्रीटीकरण करणे तर आदिवासी उपयोजन अंतर्गत नगर उथ्थान अंतर्गत गणपती गल्लीत हॉटमिक्स डांबरीकरण, बागवान गल्लीत काँक्रीटीकरण आणि काकासेठ गल्ली काँक्रीटीकरण करणे या कामास मंजुरी देण्यात आली. सदर सभेत कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र शेदाणे, नितीन शिरसाठ आदी उपस्थित होते
अनेक गैरहजर नगरसेवक
भाजपाचे विवेक चौधरी, भरतसिंग राहसे, वसुबाई पाडवी तसेच शिवसेनेच्या कोमल आनंद सोनार तसेच काँग्रेसचे विजय गणेश क्षत्रिय आदी नगरसेवक गैरहजर होते.
विवेक चौधरी यांचा घणाघात
ही विशेष सभा बोलावून सत्ताधार्यांनी मनमानी केली आहे. वास्तविक त्यांनी मागील सप्ताहांत तारीख 6 /5/ 2017 ला सर्वसाधरण सभा बोलावली होती व त्यानंतर लगेच 15 दिवसांचा आत विशेष सर्वसाधारण सभा आज घेण्यात आली म्हणजेच सत्ताधारी एक प्रकारे हुकूमशाही पद्धतीने वागत आहेत. तसेच ही विशेष सभा ठराविक ठेकेदारांच्याही लाभासाठी आज घेण्यात आली असल्याचा घणाघाती आरोप भाजपाचे नगरसेवक विवेक चौधरी यांनी केला आहे आणि या कारणांसाठीच मी आज सभेत अनुपस्थित होतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.