15 दिवस चालणारा ‘पुरुषोत्तम’चा कल्ला आजपासून

0

पुणे । ‘अरे आव्वाज कोणाचा, हिप हिप हुर्रे’ या घोषणांच्या निनादात भरतनाट्य मंदिराचा परिसर वर्षभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा दुमदुमुन जायला सज्ज झाला आहे. नाट्य स्पर्धांची पंढरी समजली जाणारी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेला मंगळवारी प्रारंभ होणार आहे. त्यामुळे महाविद्यालयीन तरुणांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी भरत नाट्य संशोधन मंदिर येथे 8 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान सायंकाळी 5 वाजता रंगणार असून नुकताच एकावन्न महाविद्यालयाच्या सादरीकरणाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा नावलौकिक आहे म्हणूनच महाविद्यालयातील जगात या स्पर्धेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रतिवर्षी प्रमाणे यंदा देखील 51 महाविद्यालय पुरुषोत्तमवर आपली मोहोर उमटविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. मागील वर्षी सर्व महाविद्यालयांना बगल देत गरवारे महाविद्यालयाच्या संघाने करंडक पटकाविला होता. त्यामुळे यंदा कोणता संघ बाजी मारणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा स्पर्धेचा श्रीगणेशा व्ही.आय.टी महाविद्यालया पासून होणार असून वेध नावाची एकांकिका हा संघ सादर करणार आहेत. त्यानंतर कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे साकव, प्रेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगर तर्फे ड्रायव्हर ही एकांकिका सादर करणार आहेत.

प्रथम फेरीचे परीक्षण आनंद पानसे, सचिन पंडित आणि रुपाली पानसे करणार असून 51 महाविद्यालया पैकी उत्कृष्ट सादरीकरण करणार्‍या 9 महाविद्यालयांना अंतिम फेरीत स्थान मिळणार आहे. स्पर्धेची अंतिम फेरी 9 व 10 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.

विविध महाविद्यालयांच्या एकांकिका
सिम्बायोसिस कॉलेजची ‘द कॉन्शन्स’ शाहू इंजिनिअरिंग महाविद्यालयाची ‘लाइफ बियाँड झिरो’ या एकांकिका 9 ऑगस्टला सादर होणार आहेत. आबासाहेब गरवारे महाविद्यालयाची ‘आफ्टर द डायरी’, फर्ग्युसन महाविद्यालय ‘भेट’, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाची ‘मुकुंद कोणी हा पाहिला’, व्हीआयआयटीची ‘कोंडी’, हडपसरच्या अण्णासाहेब मगर कॉलेजची ‘वळण’, पुणे विद्यार्थी गृहाचे ‘महा बाकी शून्य’ आणि सिंहगड कॉलेजची ‘इन बिटविन’ या एकांकिका सादर होणार आहेत.