भुसावळ । पुणे येथील उद्योजकास तांबे विक्री करण्याच्या बहाण्याने मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा परिसरात शेतात बोलावून दहा ते बार जणांनी काठी व कोयत्याचा धाक दाखवून 15 लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष न देता उलट मुख्य आरोपींना साक्षीदार बनविले असल्याने डिवायएसपी थोरात यांसह इतरही अधिकार्यांना सहआरोपी करण्याची मागणी न्यायालयाकडे अपिलाद्वारे केली आहे. भगवान चोपडे यांचे पुणे इंजिनिअरींग वर्कशॉप आहे. त्यांना यात डाईज बनविण्यासाठी भंगार व विविध धातुंची आवश्यकता असते. यासाठी त्यांनी मुंबई येथील अरविंद बांदवलकर यांच्याकडून तांबे खरेदीसाठी व्यवहार केला होता. त्यानुसार मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा फाट्याजवळील शेतात बोलविले मात्र यावेळी दहा ते बारा इसमांनी हातात काठ्या व कोयते घेवून आले व हरणाचे कातडे ठेवून मोबाईलमध्ये शुटींग करुन तस्करी करण्यासाठी आले असल्याचे सांगून पोलीसात तक्रार देण्याची धमकी दिली. गजानन, रवि, भोसले यांसह दहा ते बारा इसमांनी एकत्र येऊन तांबे विकत देण्याचा बहाणा करुन चारठाणे परिसरात फसवून 15 लाख रुपये रोख, मोबाईल, लॅपटॉप आदी वस्तू लंपास केल्या होत्या याप्रकरणी 6 एप्रिल 2016 रोजी चोपडे यांनी पोलीसात फिर्याद दिली होती.
या प्रकरणाचा स्वतंत्र पोलीस विभागामार्फत तपास करण्यात येऊन तपास अधिकारी पीएसआय सचिन इंगळे, पोलीस निरीक्षक अशोक कडलग, उपविभागीय पोलीस अधिकारी थोरात, साक्षीदार अरविंद बांदवलकर, परिश जोशी यांना सहआरोपी करण्याची मागणी चोपडे यांंनी केली आहे. फिर्यादीवरुन साक्षीदार अरविंद बांदवलकर व परिश जोशी हे गुन्ह्याचे मुख्य सुत्रधार दिसून येत आहे. यांनीच कटकारस्थान रचून चोपडे यांना फसविले आहे. त्यामध्ये पोलीस निरीक्षक कडलग, तपासी अधिकारी इंगळे, डिवायएसपी थोरात यांचे सहकार्य असल्याचे चोपडे यांनी नमूद केले आहे. याप्रकरणात तपासी पोलीसांनी जळगाव येथील हॉटेल मिनर्व्हा येथूनही काही फुटेज घेतले होते. तसेच आरोपींच्या मोबाईलचा सीडीआर रिपोर्ट घेऊनही ते दोषारोप पत्रासोबत सादर केलेले नाही. यावरुन खटल्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता कशी होईल या दृष्टीने पोलीसांनी तपास केला असल्याचे चोपडे यांनी म्हटले आहे.