चाकण परिसरातील वाहतूक कोंडी समस्येवर निष्क्रियता
विलास लांडे यांची खासदार आढळरावांवर बोचरी टीका
पिंपरी-चिंचवड : चाकण परिसरातील नागरिकांना वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. कारण, ज्या खासदारांनी वाहतूककोंडीवर मार्ग काढायला हवा होता. तो त्यांनी काढला नाही. 15 वर्षापासून त्यांची निष्क्रियता बघता जनतेने त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे बंद केले आहे. आता निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सहा महिन्यात वाहतूककोंडी सोडवू असे सांगितले जाते. जे 15 वर्षात जमलं नाही, ते सहा महिन्यात पूर्ण करण्याचे खोटे आश्वासन खासदार जनतेला देत असल्याची बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विलास लांडे यांनी नाव न घेता शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यावर केली आहे.
या ठिकाणी दररोज कोंडी
हे देखील वाचा
याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, मोशी, आळंदी फाटा, चाकण तळेगाव चौक, आंबेठाण चौक, खेडचा जुना पूल या ठिकाणी रोजच वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. चाकण-शिक्रापुर महामार्ग, शिरुर- नाव्हरा चौफुला महामार्ग, आळेफाटा, मंचर येथे कायम वाहतूककोंडी होत असते. नागरिकांना दररोज एक तास वाहतूककोंडीचा मोठा सामना करावा लागतो. गेल्या 15 वर्षात यावर काहीच उपाययोजना केल्या नाहीत. आळेफाटा ते खेड बायपासचे काम देखील रखडले आहे. या परिसरातील नागरिकांना रोजच्या वाहतूककोंडीत अडकून पडण्याची आता सवयच झाली आहे.
महामार्गाचे आश्वासन विसरला?
ज्या खासदारांनी या समस्येवर मार्ग काढायला हवा होता. त्यांनी 15 वर्षात त्यासाठी काहीच केले नाही. त्यांची निष्क्रियता बघता जनतेने देखील आता त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे बंद केले आहे. आता आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन खासदारांनी मोठ-मोठ्या घोषणा करायला सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात 2018 पर्यंत पुणे-नाशिक महामार्गाचे काम पूर्ण करून वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सोडवू, असं आश्वासन दिलं असताना 2019 उजाडलं तरी, अजून या कामाला सुरुवात देखील झाली नाही हे खासदार विसरले आहेत काय? असा सवालही लांडे यांनी केला आहे.
लोकप्रतिनिधी म्हणवून घेऊ नये
जनतेच्या पैशातून रोज विमान प्रवास करायची सवय लागलेल्या खासदारांना, सामान्य जनतेला भोगाव्या लागणा-या त्रासाची जाणीव कशी होणार? याचा जाब जनतेने विचारला असता खासदार असंवेदनशील विधाने करतात. ‘ट्रॅफिक’ तर सगळीकडे आहे यात वेगळं काय? अशी असंवेदनशील विधाने करण्यापेक्षा त्यांनी या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. जर जनतेचे प्रश्न सोडवता येत नसतील. तर, खासदारांनी स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवून घेऊ नये, असेही लांडे यांनी पत्रकात म्हटले आहे.