15 सप्टेंबरपासून पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची प्राथमिक फेरी

0

जळगाव । महाराष्ट्रीय कलोपासक मंडळ पुणे व मुळजी जेठा महविद्यालयातील नाट्यशास्त्र विभागातर्फे ‘पुरुषोत्तम करंडक आंतरमहविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या स्पर्धेसाठी 15 ते 17 सप्टेंबरदरम्यान प्राथमिक फेरी मू.जे.महाविद्यालयात घेण्यात येणार आहे. यासोबतच स्पर्धेत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड या तिन्ही विद्यापीठातील अंतर्गत महाविद्यालयांना सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत पहिल्या येणार्‍या 30 संघांनाच प्रवेश दिला जाणार आहे. एका महाविद्यालयाकडून जास्तीत जास्त दोन एकांकिकांचे प्रवेश अर्ज सादर करता येतील.

14 ऑगस्टपासून स्पर्धेचे प्रवेशअर्ज उपलब्ध
14 ऑगस्टपासून स्पर्धेचे प्रवेश अर्ज उपलब्ध होणार असून ते 31 ऑगस्ट संध्याकाळी वाजेपर्यंत जमा करावे लागणार आहे. स्पर्धेसाठी एकांकिका सादरीकरणासाठी लागणारे तंत्र साहित्य हे मू.जे. महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाकडे उपलब्ध आहे. कोणत्याही संघास तालमीसाठी किंवा सादरीकरणासाठी त्या साहित्याची आवश्यकता भासल्यास ते पुरवण्यात येणार आहे, अधिक माहितीसाठी प्रा. हेमंत पाटील, दिनेश माळी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.