श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधील हिंसाचार काही केल्या थांबत नाही. दरम्यान आज सोमवारी देखील श्रीनगर येथील मौलाना आझाद रोडवरील मार्केट परिसरात ग्रेनेड हल्ला झाला आहे. या हल्ल्यात १० जण जखमी झाले आहेत. या अगोदर जम्मू-काश्मीरमधील सोपार भागात पोलिसांना लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यास अटक करण्यात यश आले होते. तारिक चन्ना असे या दहशतवाद्याचे नाव असुन तो अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय असल्याची पोलिसांकडे नोंद आहे. यावेळी मोठ्या प्रमाणावर शस्त्र व स्फोटके देखील जप्त करण्यात आली होती.
२६ ऑक्टोबर रोजी काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे (केंद्रीय राखीव पोलीस दल) सहा जवान जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी श्रीनगरमधील करण नगर भागात सीआरपीएफच्या पथकावर ग्रेनेड हल्ला केला होता. सीआरपीएफचे एक पथक तपासणी नाक्यावर तैनात असताना सायंकाळी सातच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. जम्मू-काश्मीरच्या कुलगाम येथे देखील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात बिगर काश्मिरी असलेले पाच मजूर ठार तर एक मजूर गंभीर जखमी झाला होता. मारले गेलेले सर्वजण पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्याचे रहिवासी होते.