150 पेक्षाही जास्त अभियंते अडकणार

0

मुंबई । मुंबई महापालिकेत 34 रस्त्यांच्या कामात झालेल्या घोटाळ्यात तब्बल 96 अभियंते दोषी आढळले होते, तर त्यात आता आणखीन 200 रस्त्यांच्या कामांतील घोटाळा अहवाल येत्या शनिवारपर्यंत सादर केला जाणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या अहवालात 150 पेक्षाही जास्त अभियंते अडकण्याची शक्यता आहे. या 200 रस्त्यांच्या कामातील घोटाळ्याचा चौकशी अहवाल सादर करण्यात विलंब होत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सदर अहवाल तातडीने देण्याची मागणी केली होती. माजी महापौर व विद्यमान नगरसेविका स्नेहल आंबेकर यांनी, आयुक्त यांच्याकडे रस्ते कामात घोटाळा झाल्याची तक्रार करत सर्व प्रथम चौकशीची मागणी केली. दोन वर्षांपूर्वी झालेल्या घोटाळ्याचा पहिल्या टप्प्यातील 34 रस्त्यांच्या चौकशी अहवालात 96 अभियंते दोषी आढळले होते. त्यामुळे अहवालात अधिकार्‍यांवर कामातील अनियमिततेला जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या घोटाळ्याला जबाबदार असणार्‍या अधिकार्‍यांना नोकरीवरून काढून टाकण्याची कारवाई होणार असल्याचे समजते. 234 रस्त्यांच्या कंत्राटांमध्ये सुमारे 959 कोटी रूपयांचा घोटाळा झाला असल्याचे म्हटले जाते. रस्ते घोटाळ्याच्या दुसर्‍या टप्प्यातील चौकशीत 200 रस्त्यांची तपासणी करण्यात आली होती व त्यातही अनियमितता आढळली होती. हा अहवाल चौकशी समितीने आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे सादर केला आहे. येत्या 3 ते 4 दिवसांत हा अहवाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यातील अहवालात दोषी असणारे 96 अभियंते या अहवालातही अडकले असल्याची माहिती समोर येते आहे. दोषी अभियंत्यांचे निलंबन होण्याबरोबरच अनेकांवर दंडात्मक कारवाई बढती रोखली जाणार आहे. शिवाय नोकरीतून बडतर्फची कारवाईही केली जाऊ शकते.

चौकशीत अभियंत्यावर मेहेरनजर
मुंबईतील रस्ते घोटाळ्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक 34 रस्त्यांची तपासणी करून प्रशासनाकडून चौकशी करण्यात आली होती. चौकशीत रस्ते कंत्राटदारांना दोषी ठरवून त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला होता. 12 कंत्राट कंपन्यांना काळ्या यादीतही टाकण्यात आले आहे. मात्र, याप्रकरणी तत्कालीन रस्ते प्रमुख अभियंता अशोक पवार, दक्षता विभागाचे प्रमुख अधिकारी उदय मुरूडकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला असला तरी अन्य अभियंत्यांवर कोणतीही कारवाई केली नव्हती.