प्लॅस्टिकविरोधी कारवाईने पुन्हा जोरात; दोन ट्रक थर्माकोलही सापडले
पुणे : शहरातील प्लॅस्टिकविरोधी कारवाईने पुन्हा जोर धरला आहे. या अंतर्गत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका यांच्या वतीने पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात कारवाई करण्यात आली. यात प्लॅस्टिक विक्रेत्यांकडून 40 हजार रुपयांचा दंड आणि 150 किलोच्या प्लॅस्टिक कॅरीबॅग आणि दोन ट्रक थर्माकोल जप्त केले.
प्लॅस्टिकबंदीअंतर्गत राज्यात 50 मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या प्लॅस्टिकचे उत्पादन, विक्री आणि वापर यावर बंदी घालण्यात आली आहे. याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या सहकार्याने बंदी असलेल्या प्लॅस्टिकची विक्री आणि उत्पादन करणार्या व्यावसायिकांवर कारवाई केली जात आहे. या कारवाई अंतर्गत आतापर्यंत पुणे विभागातील 100 कंपन्यांना बंदीचे आदेश देले आहेत. विक्रेत्यांवरील कारवाईसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे नुकतेच 14 पाहणी पथक तयार केले आहेत.
मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी पथकातर्फे बालाजीनगर येथील के. के. मार्केट, कोंढवा परिसर तसेच पिंपरी-चिंचवड येथे कारवाई करण्यात आली. यात मंडळाचे पुणे झोन एक’चे उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे, पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक अधिकरी किरण हसबनीस तसेच महापालिकेचे अधिकारी सहभागी झाले होते. या कारवाईत के. के. मार्केट येथील दुकांनामधून 150 किलोच्या प्लॅस्टिक पिशव्या, कोंढवा येथील एका गोडावूनमधून दोन ट्रक थर्माकोल आणि पिंपरी-चिंचवड येथून तीन किलोचे प्लॅस्टिक जप्त केले आहे.
छुप्यापद्धतीने प्लॅस्टिकची विक्री
पर्यावरणाच्या दृष्टीने प्लॅस्टिकचा वापर अतिशय घातक आहे. त्यामुळेच मंडळातर्फे ही कारवाई केली जात आहे. मात्र, अजूनही शहरात छुप्यापद्धतीने प्लॅस्टिकची विक्री होत आहे. यातील बहुतांश माल हा परराज्यातून आलेला असतो. त्यामुळे नागरिकांनी याबाबत दक्षता राखावी. तसेच दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचा वापर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, असे राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांनी सांगितले.