नवी दिल्ली । अ श्रेणीतील खेळाडूंच्या मानधनात 150 टक्के वाढ करावी, अशी मागणी भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे व कर्णधार विराट कोहली यांनी केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी अ श्रेणीतील जे खेळाडू करारबद्ध आहेत, त्यांना याचा लाभ मिळावा, असे पहिल्यापासून अनेक खेळाडूंचे मत आहे. याशिवाय, सहायक पथकातील सदस्यांना 50 टक्के वाढीची शिफारस देखील त्यांनी केली आहे. अनिल कुंबळेनी प्रशासक समितीच्या बैठकीत याबद्दल सविस्तर प्रस्ताव सादर केला आहे. बीसीसीआयचे सीईओ राहुल जोहरी, संयुक्त सचिव अमिताभ चौधरी व खजिनदार अनिरुद्ध चौधरी या बैठकीत उपस्थित होते. कोहलीने स्काईपच्या माध्यमातून बैठकीत सहभाग घेतला. बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुंबळेनी स्वतःसाठी 25 टक्के वाढ मागितली आहे. सध्या कुंबळेंना 6.25 कोटी रुपयांचे मानधन मिळते. याशिवाय, त्यांनी विविध क्रिकेट प्रकारासाठी विविध करार असावेत, असे सूचवले आहे. अ श्रेणीत नियमित कसोटीपटूंचा समावेश असावा व यातून धोनीला वगळू नये असेही सांगितले आहे. बीसीसीआयचे पदाधिकारी कुंबळेंच्या या शिफारशींवर आपला अहवाल देणार असून त्यावर प्रशासक समिती अंतिम निर्णय घेणार आहे.
बीसीसीआयने घेतला सुरक्षेचा आढावा
मॅन्चेस्टरमधील बॉम्ब हल्ल्यामुळे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर दहशतीचे सावट पसरले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया बुधवारी इंग्लंडकडे रवाना होणार आहे. इंग्लंडमध्ये 1 जूनपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा होणार आहे. मंगळवारी मँचेस्टरच्या अरिना येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. पॉप सिंगर गायिका अरियाना ग्रांडे यांच्या कॉन्सर्टवेळी हा हल्ला झाला. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इंग्लंडला रवाना होणार्या भारतीय संघाच्या सुरक्षेबाबत बीसीसीआयने तातडीची बैठक बोलावली. भारतीय संघाच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय बैठकीत घेतल्याचे समजते. भारतीय संघाचा पहिला सामना 4 जून रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसोबत होणार आहे. त्याआधी भारतीय संघ 26 आणि 30 मे रोजी सराव सामने खेळणार आहे.
महिलांचे सामने टीव्हीवर दाखवावे: मिताली
महिला क्रिकेट सामने टेलिव्हिजनवर दाखवले जात नसल्यानेच सामन्यांना प्रेक्षकवर्ग कमी असल्याचे भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने सांगितले आहे. भारतात क्रिकेटसाठी प्रेक्षकवर्ग खूप असतो. पण तुम्ही खेळाचे सादरीकरण कसेकरता यावर त्याची लोकप्रियता अवलंबून आहे. जर तुम्ही द्विपक्षीय मालिका खेळत असाल तर सामन्याचे प्रक्षेपण होणे महत्वाचे आहे. सामना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलचे जात नाही हे दुर्देव आहे, असे मिताली म्हणाली. आयर्लंड, झिम्बाब्वे, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळविण्यात आलेल्या मालिकेत भारतीय संघाने अंतिम फेरीत द.आफ्रिकेवर 8 विकेटने विजय प्राप्त करून मालिका जिंकली. भारतीय संघाने गेल्या पाच सामन्यांमध्ये द.आफ्रिकेचा चार वेळा पराभव केला.