152 ठिकाणी मोबाइल कंपन्यांचे फलक

0

विनापरवाना फलक लावल्याबाबत संबंधित कंपनीला पालिकेकडून नोटिसा

तीन पट दंड वसुलीकडे मात्र दुर्लक्ष

पुणे : शहरामध्ये अनधिकृतपण व महापालिकेचे सर्व नियम धाब्यावर बसवत मोबाईल दुकानांच्या बाहेर सर्रास जाहिरातबाजी सुरू आहे. मोबाईल कंपन्यांनी शहरामध्ये 152 ठिकाणी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे जाहिराती केल्या आहेत. संबंधित कंपनीला महापालिकेकडून नोटिसा देण्यात आल्या आहेत, परंतु तीन पट दंड वसूल करण्याकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे.

शहरातील सर्वच दुकानदारांना आपल्या व्यवसायाची जाहिरात करता यावी, यासाठी दुकानाच्या दर्शनी भागाच्या लांबीएवढी व 3 फूट उंचीची जाहिरात लावण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु प्रत्येक गोष्टींची महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. सध्या शहरात विविध भागात विविध मोबाईल कंपन्यांच्या दुकानांच्या बाहेर महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवत मोठ्या प्रमाणात जाहिरात केली जात आहे. जंगली महाराज रस्ता, कॅम्प परिसर, नवी पेठ, कोरेगाव पार्क परिसरातील सर्वच मोबाईल दुकानांच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे समोर आले आहे.

जाहिरातींचा सर्व्हे करण्यात आला

महापालिकेच्या जाहिरात धोरण 2003 नुसार शहरामध्ये कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्यापूर्वी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. 222 रुपये प्रति चौरस फुट शुल्क आहे. सर्वच मोबाईल दुकानांच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करण्यात आल्यामुळे याबाबत महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाच्या वतीने सर्व मोबाईल दुकानदारांना नोाटिसा देऊन नियमानुसार जाहिरात शुल्क भरण्याचे आदेश दिले आहेत. परंतु महापालिकेच्या नोटिसांना केराची टोपली दाखवत मोबाईल दुकानदारांनी दुर्लक्ष केले. यात प्रशासनाने गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केल्यानंतर अखेर मोबाईल कंपन्यांनी दुकानाबाहेर जाहिरात करण्यासाठी परवानगी घेण्यास सुरुवात केली. महापालिकेच्या वतीने शहरामध्ये मोबाईल कंपन्यांकडून करण्यात येणार्‍या जाहिरातींचा सर्व्हे करण्यात आला.

352 ठिकाणी फलक

यामध्ये ओपो कंपनीने 117 ठिकाणी तर विवो कंपनीने 235 ठिकाणी जाहिरात फलक लावले आहेत. यामध्ये काही ठिकाणी परवानगी घेऊन नियमानुसार जाहिरात शुल्क भरले देखील. परंतु आजही अनेक ठिकाणी विनापरवानगी जाहीरातबाजी सुरू आहे. यामध्ये विवो कंपनीचे शहरात 68 ठिकाणी तर ओपोचे 84 ठिकाणी अशा प्रकारे विनापरवानगी जाहिराती लावण्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी विचारलेल्या लेखी प्रश्‍नामध्ये ही माहिती समोर आली.