152 वर्षांनी दिसणार आकाशात तिहेरी योग

0

मुंबई । येत्या बुधवारी, 31 जानेवारी रोजी खग्रास चंग्रहण, सुपरमून आणि ब्ल्यूमून यांचे रात्रीच्या पूर्वप्रारंभी आकाशात दर्शन होणार आहे. हा तिहेरी योग साध्या डोळ्यांनीदेखील पाहता येईल, असे खगोलअभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले. 152 वर्षांनंतर हा दुर्मीळ योग येणार आहे. यापूर्वी असा तिहेरी योग 31 मार्च 1866 रोजी आला होता. ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो, त्या वेळी त्याला ‘सुपरमून’ म्हणतात. ‘सुपरमून’ हे नाव रिचर्ड नोले यांनी 1979मध्ये दिले होते. अशा वेळी चंद्रबिंब 14 टक्के मोठे व 30 टक्के जास्त प्रकाशित दिसते.

चंद्र पृथ्वीपासून सरासरी तीन लाख 84 हजार किलोमीटर अंतरावर आहे. बुधवार, 31 जानेवारी रोजी चंद्र पृथ्वीपासून तीन लाख 59 हजार किलोमीटर अंतरावर येईल. चंद्र पृथ्वीच्या जवळ आल्याने त्या दिवशी पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाराने मोठे दिसेल. दुसरीकडे एका इंग्रजी महिन्यात ज्या वेळी दोन पौर्णिमा येतात, त्या वेळी दुसजया पौर्णिमेच्या चंद्रास ‘ब्ल्यूमून ’ म्हणतात. जरी त्याला ‘ब्ल्यूमून’ म्हटले गेले असले, तरी त्या वेळी चंद्र काही ‘ब्ल्यू’ रंगाचा दिसत नाही. या वेळी 2 जानेवारी आणि 31 जानेवारी अशा दोन पौर्णिमा आल्या आहेत. म्हणून 31 जानेवारीच्या चंद्रास ‘ब्ल्यूमून’ म्हटले आहे. याचप्रमाणे बुधवार, 31 जानेवारी रोजी खग्रास चंद्रग्रहणदेखील आहे. भारतातून ते खग्रास स्थितीत दिसेल.