16 जूनपासून रोज बदलणार पेट्रोलच्या किंमती

0

नवी दिल्ली । भारतातील सर्व तेल कंपन्या 16 जूनपासून देशभरात रोज पेट्रोलच्या दराचा आढावा घेणार आहेत. म्हणजे संध्याकाळी ज्या किंमतीत पेट्रोल भरलं असेल त्याच किंमतीत तुम्हाला सकाळी पेट्रोल मिळेल याची काही शाश्वती नाही. याचाच अर्थ कधी पेट्रोल स्वस्त असेल तर कधी महाग. पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस मंत्रालयातील सूत्रांनी तशी माहिती दिली आहे. 16 जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, पेट्रोलसोबतच डिझेलच्या दराचाही रोज आढावा घेतला जाणार का हे अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही. यापुर्वी 1 मेपासून पुदुच्चेरी,उदयपूर, आंध्र प्रदेशमधील विझाग, जमशेदपूर आणि चंदीगड या पाच शहरांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पेट्रोल, डिझेलचे दर प्रत्येक दिवशी बदलले जात होते. पेट्रोलियम पदार्थाच्या दरामध्ये रोज बदल करण्याची शिफारस तज्ज्ञांच्या समितीने केली होती.
सद्यस्थितीला भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदूस्थान पेट्रोलियम या तीन तेल कंपन्या दर 15 दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतात. या तीन कंपन्यांचे इंधन बाजारावर 95 टक्के नियंत्रण असून, त्यांचे देशभरात जवळपास 58 हजार पेट्रोल पंप आहेत.

विकसित देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलले जातात. यामुळे तेल कंपन्यांचे नुकसानाचे प्रमाण कमी होईल असा दावा केला जात आहे. तेलाचे दर दररोज बदलल्याण्याचा हा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.