राजकीय आकसापोटीच माझ्यावर आरोप – नगरसेवक तुषार हिंगे

0
 पिंपरी चिंचवड – वाढदिवसानिमित्त फुड फेस्टीव्हल आणि आठवडे बाजार भरविण्यासाठी संभाजीनगर येथील महापालिकेचा मोकळा भूखंड भाडेतत्वावर तीन दिवसांकरिता घेतला आहे. त्यासाठी भूमी आणि जिंदगी विभागाची परवानगी घेतली आहे. संभाजीनगर प्रभागातील नागरिकांचे माझ्यासारख्या कार्यक्षम नगरसेवकांना समर्थन मिळत असल्यामुळे माजी महापौर मंगला कदम यांच्या पोटात गोळा येत आहे. राजकीय आकसापोटी त्यांनी माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत, असे प्रत्युत्तर भाजपचे नगरसेवक तुषार हिंगे यांनी मंगला कदम यांच्या आरोपाला दिले आहे.
माजी महापौर कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केल्यानंतर हिंगे यांनी पालिकेत येऊन पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोपांचे खंडण केले आहे. संभाजीनगर येथील एमआयडीसीच्या मनपाच्या ताब्यातील मोकळ्या भूखंडाची सुरक्षाभींत यापूर्वीच तुटलेली आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त मी तीन दिवस त्याठिकाणी फुड फेस्टीव्हल आणि आठवडे बाजार भरवित आहे. त्यासाठी मैदानाची स्वच्छता आणि साफसफाई करत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून अवैध धंदे सुरू असताना माजी महापौर मंगला कदम यांचे या भूखंडाकडे लक्ष गेले नाही. मी कार्यक्रम घेणार म्हटल्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत, असे हिंगे म्हणाले.
या मैदानावर 8 ते 10 जानेवारी दरम्यान कार्यक्रम घेण्यासाठी प्रथम भूमी आणि जिंदगी विभागाला पत्रव्यवहार केला. त्यानंतर अ क्षेत्रीय कार्यालयाच्या मुख्य अधिकारी आशादेवी दुरगुडे यांनी रितसर भाडे आकारून मैदानाचा ताबा दिला आहे. भूमी आणि जिंदगी विभागाच्या अटी व शर्तींच्या अधिन राहून या मैदानाचा वापर केला जाणार आहे. जर, मंगला कदम यांना आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी फौजदारी गुन्हे दाखल करणार म्हटले असले तर मी त्यासाठी तयार आहे. आयुक्तांनी चौकशी करून गुन्हे दाखल करावेत, असे आव्हान हिंगे यांनी दिले आहे. पत्रकार परिषदेत महापौर राहूल जाधव उपस्थित होते.