निगडी : राष्ट्रीय सुरक्षा अॅकेडमीमध्ये (एनडीए) मराठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवा, यासाठी निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीने ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर एनडीए प्रवेश परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी एप्रिल महिन्यात 50 दिवसांच्या मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. सैन्य दलासह विविध पदांच्या प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यासाठी येत्या रविवारी (दि. 2) निगडी, प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 या वेळेत विद्यार्थी व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार
ब्रिगेडिअर (निवृत्त) हेमंत महाजन, बलजितसिंग गिल हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रशिक्षण वर्गात सहभागी होण्यासाठी 5 एप्रिलपर्यंत नावनोंदणी करायची आहे. 9 एप्रिलला विद्यार्थ्यांची ‘स्क्रिनिंग’ टेस्ट होणार आहे. प्रशिक्षण वर्गात 40 मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. 10 सप्टेंबर रोजी एनडीएची प्रवेश परीक्षा होणार आहे. प्रशिक्षण वर्गासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना 50 दिवस दररोज 4 ते 5 तास मार्गदर्शन केले जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची निवड झाल्यास त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी व अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबातील पाल्यांना सशर्त शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या वाढावी
याबाबत माहिती देताना रमेश बनगोंडे म्हणाले, एनडीएचे प्रशिक्षण घेण्यासाठी भरमसाठ फी घेतली जाते. त्यामुळे शेतकरी, गरिबांचे मुले प्रशिक्षण घेऊ शकत नाहीत. तसेच सैन्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या केवळ 3 टक्के आहे. एनडीएमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची संख्या वाढली पाहिजे, म्हणून यावर्षी प्रथमच या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यापुढे दरवर्षी हा उपक्रम राबविला जाणार असल्याचे बनगोंडे यांनी सांगितले.