ठाणे : ठाणे महापालिकेचा सन २०१७-२०१८ चा तब्ब्ल ३३९० कोटीं ७० लाख रुपये जमा खर्चाचा अर्थसंकल्प आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महासभेला सादर केला. यंदा स्थायी समिती गठीत न झाल्याने हा अर्थसंकल्प महासभेला सादर करण्यात आला. शहरातील रस्ते विकासाला महत्व अर्थसंकल्पात महत्व देण्यात आले असून पुढील पाच वर्षात ठाण्याचा विकास कसा करता येईल यादृष्टीने अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचे आयुक्तांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले.
ठाणे शहराची तहान भागविण्यासाठी शाई धरणाकरता २५ कोटींची विशेष तरतूद यांत करण्यात आली आहे. यंदा तब्ब्ल ४८० कोटींचं उत्पन्न महापालिकेने अपेक्षित धरले असून मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ४० कोटी वाढ गृहीत धरण्यात आली आहे.
अर्थसंकल्प सादर करताना महापौर मीनाक्षी शिंदे, उपमहापौर रमाकांत मढवी, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधीपक्ष नेते मिलिंद पाटील, तसेच अतिरिक्त आयुक्त रणखांब व सुनील चव्हाण हे उपस्थित होते. ठाणे महापालिकेचा २०१७-२०१ ८ या आर्थिक वर्षात २८९ कोटी आरंभीच्या शिल्लकेसह ३हजार तीनशे ९० कोटी ७८ लाख रकमेचे जमा खर्चाचे अंदाज पत्रक आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महासभेसमोर सादर केले. यात २ हजार २३३ कोटी ९२ लाख महसुली उत्पन्न आणि शासकीय अनुदान २३२कोटी ८६ लाख आणि कर्ज ५३५ कोटी अपेक्षित धरले आहे. अर्थसंकल्पात स्मार्ट सिटीला आधारभूत सुविधांना स्थान देण्यात आले आहे. अर्थसंकल्पात मालमत्ता करात दहा टक्के वाढ सुचविण्यात आली आहे. यांत बिगर निवासी मालमत्तांच्या करात ८ टक्क्यावरून १८ टक्के, निवासी मालमत्तांच्या रस्ता करात ६ टक्क्यावरून १० बिगर निवासी मालमत्ता रस्ता करात ९ टक्क्यावरून १० टक्के वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे, निवासी मालमत्ताच्या पाणीपट्टीत १२ टक्क्यावरून २२ टक्के, बिगर निवासी मालमत्तांच्या पाणी पट्टीत १७ टक्क्याहून २७ टक्के निवासी मालमत्तांच्या मल निस्सारण करात ९ टक्याहून १९ टक्के, बिगर निवासी मालमताच्या मल निस्सारण करात १२. ५ टक्क्यावरून २२ . ५ टक्के, निवासी मालमत्ताच्या मलनिस्सारण करात ५ टक्क्यावरून १५ टक्के अशी वाढ सुचविण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात ५२.४२२ कि.मी. लांबीचे रस्ते एकूण १०९ रस्त्याची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
रस्ते व वाहतूक व्यवस्थेसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. वाहतूक कोंडी थांबवण्यासाठी गुगल सोबत करार करणे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी ५ कोटी रुपये तर पारसिक चौपाटीसाठी ५० कोटीची तरतूद केली गेली आहे. मुंब्रा व दिवा याठिकाणी प्रभाग समिती बांधण्यासाठी विकास निधीची तरतूद करण्यात आली आहे. ३ कोटींची विशेष तरतूद शहरात महिला स्वच्छता गृहांसाठी करण्यात आली. ८ कोटींची विशेष तरतूद कचऱ्यापासून वीजनिर्मितीसाठी करण्यात आली आहे तर झोपडपट्टीला कचरामुक्त करण्यात येणार आहे.
आरोग्य संवर्धन व मनोरंजनाकरिता सार्वजनिक उद्यानांचा विकास, पार्किंगसाठी पार्किंग हब उभारणे, महिलांसाठी व्यायामशाळा व जिम्नस्ट सेंटर आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, शॉपिंग प्लाझा आदींसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. कासारवडवली, कळवा, खिडकाळी आदी पोलीस स्टेशन बांधणे, शहरात चित्रीकरणासाठी अद्यावत स्टुडिओ, कन्व्हेन्शन सेंटर, कम्युनिटी व मॅरेज हॉल बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. चोवीस तास पाणी पुरवठा, निवासी मालमत्तेला पाणी पुरवठा मीटरद्वारे करणे, रस्ते विकास व वाहतूक सुधारणेवर भर, चौपाटी विकास , घोडबंदर व दिवा परिसरात भुयारी गटर योजना असा विभाग निहाय व्हिजन प्लॅन पालिका प्रशासनाने तयार केला आहे.
शिवसेनेने नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या वचननाम्यात पाचशे चौ. फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्याचे जे वचन दिल होत त्याला मात्र केराची टोपली या अर्थसंकल्पात दाखविण्यात आली आहे. उलट संपूर्ण मालमत्ता करात दहा टक्क्यांची अर्थसंकल्पात वाढ सुचविण्यात करण्यात आली आहे.
शिवसेनेने आताच झालेल्या महापालिका निवडणुकीत पाचशे चौ. फुटाच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचे आश्वासन वचननाम्यात दिल होते. मात्र अर्थसंकल्पात त्याला बगल दिली गेली आहे. त्यामुळे या वाढीव मालमत्ता कराबाबत सर्वपक्षीय नगरसेवक नाराज झाले आहेत.
शहराचा विकास आराखडाबाबत मोठ्या प्रमाणात लक्ष देणारी ठाणे महानगरपालिका एकमेव महानगरपालिका असेल असे आयुक्त म्हणाले.
ठाण्याची ओळख राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्यासाठी ब्रँडिंग केले जाणार आहे.
चोवीस तास पाणी पुरवठा करण्यासाठी मीटर सिस्टिम कार्यान्वित करण्यासाठी नागरिकांकडून ५० % रक्कम घेतली जाणार आहे. चार टप्प्यात ही रक्कम भरता येणार आहे तर ५० % रक्कम महानगरपालिका देणार आहे.