पिंपरी – होळी सण साजरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शहरातील कोकणवासीय गावी जातात. प्रवाशांची संख्याही अधिक असल्याने बसेसअभावी कोकणवासीयांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे. पिंपरीतील वल्लभनगर आगारातून कोकणवासियांसाठी ज्यादा बसेस सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती आगारव्यवस्थापक एस. एन. भोसले यांनी ही माहिती दिली.
कोकणात होळी सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या सणानिमित्त शहरातील चाकरमनी कोकणात धाव घेतात. मात्र, अनेकदा मेल, एक्सप्रेस गाड्या फुल असतात. त्यामुळे कोकणवासीयांची चांगलीच अडचण होते. त्यामुळे एसटी प्रशासनाने होळीनिमित्त जास्तीच्या बसेसची सोय केली आहे. चिपळूण, दापोली, गुहागर, खेड, महाड, पोलादपूर, वेंगुर्लासाठी जादा बस सोडल्या जाणार आहेत. सर्व जादा गाड्यांचे आरक्षण सुरू करण्यात आले आहे.