17वर्षांखालील फिफा विश्‍वचषक नवी मुंबईकरांच्या भेटीला

0

नेरुळ । पुढील महिन्यापासून भारतात खेळवण्यात येणारा17 वर्षांखालील फिफा विश्‍वचषक बुधवारी नवीमुंबईकरांच्या भेटीसाठी शहरात दाखल झाला होता. राज्याचे शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी नवी मुंबईतील डॉ.डी. वाय. पाटील स्टेडियमवर या विश्‍वचषकाचे स्वागत केले .यावेळी भाजप खासदार तसेच भारताचे अवजड उद्योग राज्यमंत्री बाबूल सुप्रीयो, शिवसेना युवसेनाप्रमुख आदित्य ठाकरे, डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियमचे अध्यक्ष विजय पाटील तसेच नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण उपस्थित होते.

यावेळी प्रेक्षकांसाठी फुटबॉलचा प्रेक्षणीय सामना खेळवण्यात आला. विविध देशांचे प्रशिक्षक व भारतीय खेळाडू यांच्यात हा सामना खेळवला गेला. यात भारताच्या प्रशिक्षकाची भूमिका आदित्य ठाकरे यांनी निभावली; तर राज्यमंत्री बाबूल सुप्रीयो यांनी आपली फुटबॉल खेळाची हौस भागवून घेतली.यावेळी स्पेन प्रशिक्षक कार्लोस वालदेररामा म्हणाले; की भारतातील खेळाडू चांगले आहेत. त्यांच्या मायभूमीत ते खेळत असल्याने त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल. तर नायजेरियाचे प्रशिक्षक फर्नांडो मोरिएंटेस म्हणाले की; खेळाडू घडवायचे असतील तर त्या पद्धतीने खेळाची मैदाने, सोयी सुविधा मिळणे गरजेचे आहे.तसेच स्पेन व फ्रान्स या देशांत या सुविधा उपलब्ध असून शिक्षणाबरोबरच लहान मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षणसुद्धा देण्यात येते. मात्र याचा अभाव नायजेरियात दिसून येतो. जर नायजेरियात अशा पद्धतीने सोयी सुविधा मुलांना उपलब्ध झाल्या तर नायजेरियाचा फुटबॉल संघ नक्कीच जगात नाव कामावेल. यावेळी जगातला कोणता खेळाडू आवडता आहे असे या प्रशिक्षकांना विचारले असता,मअर्जेंटिनाचा दिएगो मॅरेडोना असल्याचे सर्वांनी एकमुखी सांगितले. तर मेस्सी की रोनाल्डो यात कोणता खेळाडू उजवा? याला उत्तर देताना मेस्सी हा उजवा वाटतो असे सर्वांनी सांगितले.