17 लाखांच्या मोबाईल चोरीप्रकरणी तीन संशयितांना अटक

0

जळगाव। शिवतीर्थ मैदानासमोरील वायरलेस वर्ल्ड मोबाइलच्या दुकानात 6 एप्रिल रोजी रात्री चोरट्यांनी 17 लाख रुपये किमतीचे 107 मोबाइल चोरून नेले होते. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, अशाच प्रकारच्या गुन्ह्यात औरंगाबाद पोलिस पोलिसांनी तीन संशयीताना अटक केली होती. त्यांना मंगळवारी रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने अटक केली आहे. तर जिल्हा पेठ पोलिसांकडून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

90 मोबाईल नेपाळमध्ये अ‍ॅक्टीव्हेट
जे. टी. चेंबरमधील जी-1 या राजेंद्र अरूण बारी आणि पुरूषोत्तम अरूण बारी या दोन्ही भावांच्या वायरलेस वर्ल्ड नावाच्या मोबाइल दुकानातून चोरट्यांनी 6 एप्रिल रोजी 17 लाख रुपये किमतीचे 107 मोबाइल लंपास केले होते. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून एलसीबी आणि जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पथक गेल्या महिन्यात बिहारमध्ये होडासन येथे गेले होते. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नव्हते. त्यानंतर गेल्या आठवड्यात चोरीच्या 107 मोबाइल हण्डसेटपैकी 90 नेपाळमध्ये अ‍ॅक्टीव्हेट झाल्याची धक्कादायक बाब समोर आली होती.

औरंगाबाद शहरातील क्रांतीचौक पोलिस ठाण्याच्या हद्दीत 14 एप्रिल रोजी रात्री अशाच पद्धतीने मोबाइल चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी मिन्टूकुमार देविकांत ठाकूर (वय 22, रा. बिसनपुरा, जि. मोतीहारा, बिहार), समीर शहा मुस्तफा देवान (वय 28, रा. जगदंबानगर, जि. मोतीहारा), अब्दूल कादीर अस्लम देवान (वय 28, रा. पकईटोला, जि. मोतीहारा) यांना अटक केली होती. यातील एका चोरट्याचा चेहरा वायरलेस वर्ल्ड दुकानातील चोरीशी मिळताजुळता आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी सहायक पोलिस निरीक्षक संदीप आराक, अजित पाटील, छगन तायडे, संदीप पाटील यांचे पथक मंगळवारी तिनही चोरट्यांना ताब्यात घेण्यासाठी गेले होते. बुधवारी सकाळी औरंगाबाद कारागृहातून जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले.