पिंपरी-चिंचवड : कधी थंड हवा तर कधी कडक उन्हाचा तडाखा. कधी सोसाट्याच्या वारा तर कधी पाऊस, अशा सतत बदलत्या व प्रचंड आव्हानात्मक मोसमातही पिंपरी-चिंचवडमधील दोन सायकलप्रेमी युवकांनी अवघ्या 17 दिवसातच पुणे ते नवी दिल्ली ते वाघा बॉर्डर असा तब्बल दोन हजार 126 किलोमीटर अंतराचा प्रवास सायकलींवरून पूर्ण केला. सागर वाडकर व अभय फटांगरे अशी या ध्येयवेड्या युवकांची नावे आहेत. या प्रवासादरम्यान, दोघांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या केंद्र शासनाच्या योजनेविषयी प्रबोधन केले. विशेष म्हणजे, या प्रवासादरम्यान दोघांना अनेक कठीण प्रसंग, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जावे लागले. परंतु प्रचंड इच्छाशक्ती अन् मेहनतीच्या बळावर त्यांनी हे आव्हान लीलया पेलले.
26 फेबु्रवारीला यात्रेला सुरुवात
अभय फटांगरे हे उद्योजक असून, सागर वाडकर हे एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये डिझाइन इंजिनीअर आहेत. निगडी येथील भक्ती-शक्ती शिल्पसमूह येथून 26 फेब्रुवारीला त्यांनी आपल्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ जनजागृती यात्रेला सुरुवात केली होती. 15 मार्चला ते अटारी बॉर्डर (वाघा बॉर्डर) ला पोहोचले. ते म्हणतात की, अनेक योजना व विकास कार्यक्रम सरकारकडून सुरू आहेत. पण दुर्गम भागातील मुलींना हे फायदे मिळत नाहीत. त्यामुळे त्या आताही जुन्या काळातील शिक्षणपद्धती आणि जीवन जगत आहेत. ग्रामीण भागातील मुलींनाही चांगल्या पद्धतीचे शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी त्यांच्या पालकांमध्ये या योजनेविषयी जागरुकता करणे गरजेचे आहे. म्हणूनच आम्ही हा उपक्रम राबवल्याचे त्यांनी सांगितले.
दररोज 110 ते 150 किमी प्रवास
यासंदर्भात माहिती देताना अभय व सागर म्हणाले की, आम्ही रोज पहाटे 5 वाजता प्रवास सुरू करत होतो. सतत बदलणारे हवामान, कडक ऊन, सोसाट्याचा वारा आणि खराब रस्त्यांवर सायकलीचे टायर सारखे पंक्चर होत होते. अडचणींना तोंड देत रोज 110 ती 150 किलोमीटरचा प्रवास करत होतो. ज्याठिकाणी मुक्काम असे तेथील लोकांना या योजनेविषयी माहिती देत होतो. ठाणे, सुरत, उदयपूर, जयपूर, शहापुरा आणि नवी दिल्ली येथील लोकांनी सायकल मोहिमेचे कौतुक केले, शुभेच्छा दिल्या आणि रात्री राहण्याची सोयही केली, असे ते म्हणाले.
मोहिमेचे ठिकठिकाणी कौतुक
या मोहिमेसाठी ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’ अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक राजेंद्र फडके यांची आम्हाला मोलाची मदत झाली. राजस्थानमधील वृत्तपत्रांनी आमच्या मोहिमेची चांगली दखल घेतली. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्यावर जयपूरमध्ये राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना भेट दिली असता त्यांनी आमच्या मोहिमेचे कौतुक केले. नवी दिल्ली येथे केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी आम्हाला सायकलिंग करत असताना पाहिले आणि स्वतःहून त्यांच्या शासकीय निवासस्थानी घेऊन गेले. तेथे आमच्या मोहिमेची सविस्तर माहिती घेऊन आम्हाला सर्वतोपरी मदत देऊ केली, असेही अनुभव त्यांनी कथन केले.