17 लाखांत गंडवून 10 महिन्यांपासून फरार भामटा पोलिसांच्या जाळ्यात

0

सायबर पोलिसात आहे फसवणुकीचा गुन्हा दाखल ; नाव, पत्ते बदलावून ठिकठिकाणी वास्तव्य आणि फसवणूक

जळगाव- मोबाईल रिचार्ज बॅलेन्स उपलब्ध करुन देण्यासाठी बेकायदेशीरपणे ऑनलाईन मोबाईल अ‍ॅप्लीकेशन तयार करुन लोकांकडून लाखो रुपये घेऊन पळुन गेलेल्या व पोलिसांसाठी डोकेदुखी ठरलेल्या समीर शेख उर्फ राजा भाई उर्फ मोहम्मद कलीमोद्दीन खान (रा.आरएन पार्क अपार्टमेंट, रामनगर, मेहरुण ) या भामट्यास दहा महिन्यांनंतर सायबर पोलिसांनी अटक केली. 17 लाख 45 हजार 324 रुपयांत फसवणुक केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात 10 जानेवारी 2018 मध्ये गुन्हा दाखल झाला होता. नाव व पत्ता बदलावून तो भोपाळ येथे राहत असल्याची माहिती मिळाली आहे. या गुन्ह्यातील फिर्यादीने आरोपींना अटक करावी म्हणून आरोपींच्या नावाने फेसबुकच्या माध्यमातून देशभरात स्फोट घडविण्याची धमकी दिल्याचा प्रकारही घडला होता. या प्रकारानंतर सायबरच्या पोलिसांनी संशयित समीर शेख उर्फ राजाला अटक केली आहे.

काय आहे गुन्हा दाखल
समीर शेख उर्फ राजा भाई उर्फ मोहम्मद कलीमोद्दीन खान (रा.आरएन पार्क अपार्टमेंट, रामनगर, मेहरुण ) असे अटक केलेल्या भामट्याचे नाव आहे. खान याने गतवर्षी बीग किंग व्हॅलेट व अतीया पे वर्ल्ड हे दोन बेकायदेशीर अप्लीकेशन तयार केले. या वेबसाईटवर अनेक लोकांना लिंक केले. या माध्यमातून त्याने रिचार्ज बॅलेन्स देण्यासाठी जास्त कमिशन देण्याचे आमीष नागरीकांना दिले होते. त्यानुसार अमान इरफान अन्सारी (रा.फातीमानगर, एमआयडीसी) यांना 17 लाख 45 हजार 324 रुपयांमध्ये गंडवले. तसेच भाविक रमेशचंद वेद, मोहम्मद नासिर अन्वर हुसेन, रिजवान अहमद शेख रमजानी, अशफाक खान अयुब खान, डॉ.शेख फिरोज, अहमद इबने मोहम्मद युसूफ, शेख जहीर अहमद कासम, अल्ताफ खान अयुब खान, अल्ताफ मुनाफ खाटीक या लोकांकडून त्याने लाखो रुपये घेतले होते. तर लोकांना मोबदल्यात बॅलेन्स दिला नव्हता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर लोकांनी त्यांच्याकडे पैसे परत मागण्यासाठी तकादा लावला होता. यामुळे खान हा कुटुंबियांसह जळगावातून पळून गेला होता. त्याचे घर बंद असल्याचे पाहुन नागरीकांनी त्याचा शोध देखील घेतला परंतू, तो मिळुन आला नाही. अखेर अमान अन्सारी यांनी या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हा गुन्हा सायबर पोलिसांकडे तपासाला दिला होता.

फिर्यादीनेच आरोपी अटकेसाठी लढविली होती शक्कल
एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर काही महिने उलटूनही आरोपीला अटक होत नसल्याने फिर्यादी अमान इरफान पिंजारी याने आरोपींचे फेसबुक अकॉऊंट हॅक करुन त्यावरुन आरोपी पती व पत्नीच्या नावे देशभरात स्फोट घडवून आणण्याची धमकी दिली होती. यावेळी राज्यभरात खळबळही उडाली होती. 25 मे रोजी घडलेल्या प्रकाराचा पाच दिवसांनंतर फेसबुक व मोबाईल कंपन्यांच्या माध्यमातून पोलिसांची छडा लावला होता. यात फिर्यादी अमान पिंजारीने आरोपींना अटक करण्यासाठी हा प्रकार केल्याचे समोर आले होते. यावेळी सायबर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी पैसे घेतल्यानेच आरोपी समीर शेख उर्फ राजा भाई उर्फ मोहम्मद कलीमोद्दीन खान याला अटक होत नसल्याचा आरोपही पिंजारी याने केला होता.

नाव बदलून राहिला भोपाळमध्ये
संशयित खान हा इंदूर शहरात राहत असल्याची माहिती जानेवारी 2019 मध्ये सायबर पोलिसांना मिळाली होती. या पोलिसांचे एक पथक त्याच्या शोधासाठी इंदूर शहरात गेल होते. दरम्यान, पोलिस मागावर असल्याचे कळाल्यानंतर तो इंदूर शहरातून देखील बेपत्ता झाला होता. यानंतर तो झहीर खान असे नाव बदलून राहत होता. अशी माहिती सायबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक दत्तात्रय परदेशी, उपनिरीक्षक अंगत नेमाने, वसंत बेलदार, श्रीकांत चव्हाण, दिलीप चिंचोले, अजय सपकाळे, आफ्रीन मन्सुरी यांच्या पथकाने त्याला भोपाळ शहरातील शामला हिल भागातून त्याला ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता त्याला 14 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.