मुंबई। विश्वकरंडक 17 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेतील भारताच्या लढती मुंबईऐवजी नवी दिल्लीत खेळवल्यास स्पर्धेत भारताचा मार्ग खडतर होऊ शकेल, असे मत फुटबॉल अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. लढती ठरवण्याचा अंतिम अधिकार जागतिक महासंघालाच आहे, असे काही पदाधिकारी सांगत असल्याने अडचणी वाढत आहेत. यजमान असल्यामुळे भारतास या स्पर्धेत मानांकन मिळाले आहे. भारत स्पर्धेचा यजमान आहे. त्यामुळे भारताचा समावेश अ गटातच असणार. डी. वाय. पाटील स्टेडियमवर अ गटातील सहापैकी पाच लढती आहेत. या गटातील दुसरे तसेच तिसरे मानांकन असलेला संघ आपली शेवटची साखळी लढत दिल्लीत खेळणार आहे. ही 12 ऑक्टोबरची लढत दिल्लीत खेळवण्याचा पर्याय नक्कीच आहे. भारतास गटात अव्वल मानांकन नसेल तसेच चौथाही नसेल. या परिस्थितीत ही लढत दिल्लीत होऊ शकेल.
बदल झाल्याची आम्हाला माहिती नाही
स्पर्धा कार्यक्रमात बदल झाल्याची आम्हाला काहीही माहिती नाही, असे स्पर्धा संयोजन समितीतील वरिष्ठ पदाधिकार्यांनी सांगितले. त्याच वेळी त्यांनी या वृत्तास पुरेसा आधार आहे, असे आम्हाला वाटत नाही. त्यामुळे त्याबाबत काही भूमिका मांडणेही योग्य ठरणार नाही. स्पर्धा कार्यक्रमातील बदलासारख्या गोष्टी अशा वर्तमानपत्रात सांगून घडत नाहीत, असेही या पदाधिकार्यांनी सांगितल्याचे वृत्त आहे. स्पर्धेचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. त्यानुसार अ’ गटाच्या लढती नवी मुंबईत; तर ब गटाच्या लढती दिल्लीत होणार आहेत. आता मुंबईत लढती झाल्यास भारताच्या गटात दोन कमकुवत संघ येऊ शकतील; पण दिल्लीत झाल्यास त्या गटात एकच संघ कमकुवत असेल. या परिस्थितीत भारतासमोरील आव्हान जास्तच खडतर होईल, असे फुटबॉल अभ्यासकांचे मत आहे.