भुसावळ । येथील तालुका शेतकी संघाच्या निवडणुकीसाठी सोसायटी मतदार संघातून 100 टक्के तर व्यक्तीशः मतदार संघातून 38.5 टक्के मतदान झाले. तब्बल 17 वर्षांनंतर निवडणूक झाल्यामुळे मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. 27 रोजी मतमोजणी आहे. म्युनिसिपल हायस्कुलमध्ये सात बुथवर मतदानास सकाळी 8 वाजता प्रारंभ झाला. भुसावळसह बोदवड तालुक्यातील मतदारांचा समावेश असल्यामुळे व कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीनंतर सहकार क्षेत्राची मोठी निवडणूक असल्यामुळे मतदान केंद्राबाहेर दिवसभर गर्दी दिसून आली. सोसायटी मतदार संघात केवळ 66 मतदार होते. या गटातून 100 टक्के मतदान झाले तर व्यक्तीशः मतदार संघात 2 हजार 549 मतदार होते. यातील 985 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, व्यक्तीशः मतदार संघात मयत मतदारांची संख्या मोठी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे उत्साह असला तरी टक्केवारी कमी असल्याचे दिसून आले.
मतदानापासून वंचित ठेवले
दरम्यान, सोसायटी मतदार संघासाठी बोदवड तालुक्यातील शेलवड येथील कस्तुराबाई जगन्नाथ डापसे या वृध्द महिला मतदाराने मतदान केंद्राध्यक्ष व शिपाई यांनी माझ्या चार मतपत्रीका घाई करुन मतदान पेटीत कोर्या टाकल्याची तक्रार केली आहे. मतपत्रिकांची घडी करत असतांना वेळ लागत असल्यामुळे या कर्मचार्यांनी मतपत्रिका कोर्या टाकल्याची लेखी तक्रार केली असून मला मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तरी याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. सोमवार 27 रोजी हिंदू हौसिंग सोसायटीच्या हॉलमध्ये मतमोजणीस सकाळी 8 वाजता प्रारंभ होणार आहे.
आजी- माजी आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क
आमदार संजय सावकारे, माजी आमदार दिलीप भोळे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती प्रल्हाद सोनजी चौधरी यांनी मतदानाचा हक्क बजावला.
केंद्राबाहेर यांची होती उपस्थिती
मतदानाप्रसंगी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, नगरसेवक अॅड. बोधराज चौधरी, पंचायत समिती सभापती सुनील महाजन, माजी सभापती राजेंद्र चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोपान भारंबे, माजी सभापती संजय पाटील, नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, गिरीश महाजन आदी केंद्राबाहहेर थांबून होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक अधिकारी आर.आर. पाटील तर सहाय्यक म्हणून आर.पी. निकाळे यांनी काम पाहिले. मतदानानंतर मतपेट्या सहाय्यक निबंधक कार्यालयात ठेवण्यात आल्या.