17 शिक्षकांना डी.एड. नसतांनाही दाखविले प्रशिक्षीत

0

जळगाव। जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातंर्गत येणार्‍या अपंग युनिटमधील दोनशे शिक्षकांचे 2012-13 मध्ये समायोजन करण्यात आले आहे. यातील 17 शिक्षक जे प्रशिक्षीत (डिएड्) नसताना त्यांना प्रशिक्षित म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. याबाबत चौकशी करून तत्कालिन शिक्षणाधिकारी शिवाजी पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्थायी समिती सभेत जिल्हा परिषद आणि स्थायी समिती सदस्य नानाभाऊ महाजन यांनी केली.

बीडीओंची होणार चौकशी
अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील ग्रामसेवक संजय भाईदास पाटील यांनी 2013 मध्ये 11 हजार 200 स्क्वेअर फुट इतकी जागा वडील व काकांच्या नावे केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करुन त्यांना पिंपळी येथे नियुक्ती देण्यात आली. याठिकाणी देखील निलंबनाची कारवाई होवून 31 महिन्यांनंतर पुन्हा दहिवद देण्यात आल्याचा मुद्दा सभेत मांडण्यात आला. बीडीओंकडून चूक झाल्याचे सांगत पटाईत यांची चौकशी करण्याचे आदेश सीईओंनी दिले.

ग्रामपंचायतींना मिळणार व्यायामशाळा
ग्रामपंचायतीसाठी व्यायामशाळा संदर्भात 297 ग्रामपंचायतींकडून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव आले परंतू मंजूरी देण्यात आली नसल्याचा मुद्दा रावसाहेब पाटील यांनी उपस्थित केला. क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी प्रस्ताव मंजूर करून व्यायाम शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. अंजनविहिरे येथील शौचालयाचे 96 लाभार्थ्यांचे अनुदान परस्पर काढण्यात आल्याची तक्रार करण्यात आली.

सुरक्षा रकमेची दिरंगाई
एखाद्या कामाबाबत संबंधीत ठेकेदाराकडून सुरक्षा अनामत रक्कम घेण्यात येत असते. मात्र कामे होवून देखील ठेकेदारांची सुरक्षा अनामत रक्कम मिळालेली नाही. अशा शंभर फाईली अजून प्रलंबित असून, यातील केवळ चारच फाईली मंजूरीसाठी ठेवण्यात आल्याचा मुद्दा सभेत उपस्थित झाला. सीईओ दिवेगावकर यांनी तक्रार आल्यास कारवाई करण्याचे संकेत दिले. शालेय विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळाले नसल्याने महाजन यांनी नाराजी व्यक्त केली.