17 सिंचन प्रकल्पांसाठी 700 कोटींची तरतूद

0

जळगाव। जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी सन 2016-17 मध्ये जिल्ह्यातील 17 सिंचन प्रकल्पांसाठी 476 कोटी 38 लाख रुपये व सन 2017-18 करीता 221 कोटी 19 लाख रुपयांचा असे एकूण 697 कोटी 57 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. वर्षभरात 22 हजार 765 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याच्या उद्दिष्टाकडे तापी पाटबंधारे विकास महामंडळाची वाटचाल सुरु आहे.

बंदिस्त पाईप लाईन वापरणार
2016-17 या अर्थसंकल्पीय वर्षात 17 प्रकल्पांकरिता रुपये 476.38 कोटी इतकी तरतूद केली. पंतप्रधान कृषी सिंचाई योजनेंतर्गत समाविष्ट वाघूर प्रकल्पासाठी े 409.00 कोटीची तरतूद करुन कामांना गती देण्यात आली.वाघुर उपसा सिंचन योजनेमधील जामनेर, गारखेडा व गाडेगाव या शाखा मार्फत 12245 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. कालव्याच्या व वितरिकांच्या कामाच्या भूसंपादनास असणार्‍या विरोधामुळे आसोदा व भादली शाखा व वितरिकाकरिता दाबयुक्त बंदिस्त पाईप लाईनचा वापर करुन 15264 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी नियोजन केले आहे.वाघुर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात 80 गाळरोधक बंधारे बांधण्यात आले.

विविध प्रकल्पांसाठी तरतुदी
शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पाच्या 699.48 कोटी रकमेस शासनस्तरावरुन प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. अटलगव्हाण लघुपाटबंधारे व दिघी-3 साठवण तलाव या दोन प्रकल्पांनाही प्रशासकीय मान्यता देण्यात आली. गिरणा नदीवरील सात बलून बंधारे योजनेचा प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून प्रशासकीय मान्यतेसाठी शासनास सादर करण्यात आला. बोदवड उपसा सिंचन योजनेची कामे सुरु करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त झाली आहे. वरखेड लोंढे मध्यम प्रकल्पासाठी 40.00 कोटी इतकी तरतूद करुन रेंगाळलेल्या प्रकल्पास चालना देण्यात येत आहे. निम्न तापी पाडळसे प्रकल्पासाठी 25.00 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.