पालिकेच्या बंधार्यातील पाणी संपल्याने रणरणत्या उन्हाळ्यात शहरवासीयांचे हंडाभर पाण्यासाठी हाल : पालिकेकडून 11 टँकरने पाणीपुरवठ्याचा दावा : नगरसेवकांनाही करावी लागतेय पदरमोड ; पालिका करणार जुन्या विहिरींचे पुनर्जीवन ; सहा विहिरींचा लवकरच निघणार गाळ
भुसावळ- भुसावळ आणि पाणीटंचाई आता हे समीकरण दृढ झाले असून गेल्या चार महिन्यात तब्बल चारवेळा पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवण्याची नामुष्की सत्ताधार्यांवर आल्याने जनतेतून त्यांच्यावर टिकेचा भडीमार होत आहे. कधीकाळी विरोधात असलेले भाजपाचे पदाधिकारी आता सत्तेत असतानाच त्यांना पाणीटंचाईच्या प्रश्नामुळे नागरीकांना तोंड देताना नाकीनऊ आले आहे. फेब्रुवारी महिन्यात दोन वेळा तर मार्च महिन्यात एक वेळा रॉ वॉटर यंत्रणा बंद ठेवण्याची नामुष्की ओढवल्यानंतर पुन्हा 7 एप्रिलला पालिकेच्या बंधार्यातील जलसाठा अवघ्या 19 दिवसात संपल्याने शहरवासीयांची हंडाभर पाण्यासाठी भटकंती होत आहे. दरम्यान, टंचाईच्या पार्श्वभूमीवर पालिकेने स्वःमालकिच्या सहा तर भाड्याने लावलेल्या पाच टँकरद्वारे शहरवासीयांची तहान भागवली जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
पालिका करणार जुन्या विहिरींचे पुर्नजीवन
शहरातील विविध भागात पालिकेच्या मालकिच्या विहिरी असल्यातरी त्यातील पाण्याचा उपसा गेल्या अनेक वर्षांपासून झालेला नाही तर सातत्याने शहरवासीयांना पाणीप्रश्न भेडसावत असल्याने नागरीकांना दिलासा मिळण्यासाठी या विहिरींचे पुर्नजीवन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. शहरातील पालिकेच्या जुन्या ईमारतीतील विहिरीसह जुना सातारा, जामनेर रोड तसेच अन्य भागातील विहिरींचे पुर्नजीवन केले जाणार असून विहिरीतील गाळ या माध्यमातून काढला जाणार आहे तसेच पालिकेचे टँकर भरण्यासह येथे पंप बसवून नागरीकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी सांगितले शिवाय पालिकेच्या माध्यमातून 11 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ज्या भागात पाणी मिळत नसेल त्या भागातील नागरीकांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यावलसह अमळनेर व धरणगाववासीयांना दिलासा
भुसावळ शहरासाठी हतनूर धरणातून आवर्तन सोडण्याबाबत अद्याप निर्णय झाला नसलातरी यावलसह अमळनेर व धरणगाव तालुकावासीयांना मात्र भर उन्हाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे. हतनूर धरणाच्या कालव्यातून तीनही तालुक्यासाठी 9 एप्रिलपासून 666 डे क्यूसेसप्रमाणे आवर्तन सोडण्यात आले असून 19 पर्यंत पाणी सुरू राहणार आहे. दरम्यान, भुसावळ शहरासाठी लवकरच आवर्तन सोडण्यात यावे, अशी शहरवासीयांची अपेक्षा आहे.
नगरसेवकांची पदरमोड ; टँकरवर मदार
शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने शहरवासीयांना आता त्या-त्या प्रभागातील नगरसेवकांसह पालिकेकडून टँकरने होणार्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून रहावे लागत आहे. सत्ताधारी नगरसेवक पिंटू कोठारी म्हणाले की, प्रभागातील नागरीकांसाठी स्वखर्चाने साधारणतः दिवसभरातून 20 टँकर पाणीपुरवठा होत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरीकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. याप्रमाणे शहरातील अन्य प्रभागातील नगरसेवकदेखील पदरमोड करून नागरीकांना पाणीपुरवठा करीत आहेत. दरम्यान, दक्षिण भागातील कुपनलिका, बोअरिंग आटल्याने दक्षिण भागाला सर्वाधिक टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचे चित्र आहे.
खरेदीनंतरही भुसावळात येईनात पाण्याचे टँकर
शहरवासीयांना पाणीटंचाईची भेडसावणारी अडचण लक्षात घेता पालिकेने दहा नव्याने टँकर खरेदीचे नियोजन केले होत मात्र एप्रिल महिना उजाडूनही कर्नाटकातील कंत्राटदाराने टँकरचा पुरवठा केला नसल्याचे चित्र आहे. पालिकेने कर्नाटकातील एका एजन्सीला हे काम दिले आहे मात्र या एजन्सीकडून टँकर पुरवठा करण्यासाठी दिरंगाई होत आहे. प्रशासनाकडून लवकरच या कंत्राटदारास नोटीस बजावली जाणार आहे.