कैदी चिंग्याला खाजगी वाहनातून दिवसभर फिरवले ; दोन कर्मचार्यांना एमआयडीसी पोलिसांनी घेतले ताब्यात
जळगाव – खून प्रकरणात उपजिल्हा कारागृहात असलेला कैदी चेतन आळंदे उर्फ चिंग्या (रा. गणेशवाडी) न्यायालयातील कामकाज संपल्यानंतरही कारागृहात गेला नाही. त्याने व त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी रात्री 9.30 वाजता तुकारामवाडीतील अरुण भीमराव गोसावी (वय 43, रा. तुकारामवाडी) या प्रौढाला कारमध्ये डांबून मारहाण केली. पोलीस अधीक्षकांनी या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेवून तपासाच्या सुचना केल्या होत्या. कर्तव्यात कसूर करुन तसेच संशयितांसोबत गोसावी मारहाण करणार्या पोलीस मुख्यालयातील मुकेश आनंदा पाटील व गोरख हिंमतराव पाटील यांना एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण दोघा कर्मचार्यांना चांगलेच भोवणार असून दोघांवर निलंबनाची टांगली तलवार असल्याची माहिती मिळाली आहे.
काय घडली होती घटना
कासमवाडीतील युवकाच्या खून प्रकरणात चिंग्या उपजिल्हा कारागृहात कच्चा कैदी आहे. गुरुवारी चिंग्याची कोर्ट पीसी होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला न्यायालयात नेले होते; परंतु जिल्हा न्यायालयीन कामकाज झाल्यानंतर चिंग्या कारागृहात परतला नाही. तो त्याच्या कासमवाडी येथील घरी गेला होता. रात्री 9.40 वाजेच्या सुमारास चिंग्या हा गोलू उर्फ लखन दिलीप मराठे (रा. शिवाजीनगर परिसर) व एका अनोळखी व्यक्तीसोबत कारने (क्रमांक एमएच 19, सीयू 8500) तुकारामवाडी परिसरामधील रिगा अपार्टमेंटसमोर आले. या वेळी मोकळ्या जागेत अरुण गोसावी हे आकाश सुकलाल ठाकूर, पवन दिलीप बाविस्कर, आकाश गोकूळ पारे, विशाल कोळी, परशुराम शिवराम मोरे यांच्यासोबत उभे होते. चिंग्याने व त्याच्या मित्राने कारमध्ये बसवून घेवून जात कारागृहासमोर गोसावींना मारहाण केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चिंग्यासह, गोलू उर्फ लखन दिलीप मराठे रा. शिवाजीनगर व अनोळखी पोलीस बाबा अशा तीघांविरोधात 14 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
‘चिंग्या’नेण्यासाठी कर्मचार्यांची होती ड्युटी
चिंग्याला कारागृहातून बाहेर काढून त्याला न्यायालयात हजर करणेकामी पोलीस हेडकॉस्टेबल मुकेश आनंदा पाटील, सुरेश श्रीराम सपकाळे, गोरख हिंमतराव पाटील या तिघा कर्मचार्यांची ड्युटी होती. या तिघांची विभागातील डायरीवर 8.30 वाजता निघाल्याची नोंद तर कारागृहातून चिंग्याला सोबत घेतल्याची 10.30 ची नोंद आहे. मात्र कर्मचार्यांनी कारागृहात कैद्याला सोडल्यानंतर पुन्हा आल्याची नोंद नाही.
एमआयडीसी पोलिसांकडून पत्रव्यवहार
गोसावी यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेवून संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात येवून चौकशी करुन संबंधितांना अटक करण्याच्या सुचना अधीक्षकांनी दिल्या होत्या. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले होते. सीसीटीव्ही फुटेजनुसार वाहन तसेच संशयित निष्पन्न झाले होते. कारागृहाचा कैदी असताना बाहेर येवून मद्यप्राशन तसेच मारहाण करणार्या चिंग्या याला अटक करण्याची परवानगी द्यावी यासाठी एमआयडीसी पोलीस स्टेशनतर्फे न्यायालयात पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी यांच्याबाबत संबंधित विभागाकडून माहिती मागविण्यात आली होती.
ते दोघे पोलीस कर्मचारी ताब्यात
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर त्या दोघे पोलीस कर्मचार्यांचा एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांकडून शोध घेतला जात होता. त्यांचे मोबाईलही लोकेशन तपासले होते. लोकेशननुसार मुकेश पाटील व गोरख पाटील या दोघांना पोलिसांनी शनिवारी रात्री उशीरा ताब्यात घेतले. उशीरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरु होती. ताब्यात घेतलेल्या दोघांपैकी मुकेशवर यापूर्वी अशाचप्रकारे कैद्याच्या प्रकरणात निलंबनाची कारवाई झाल्याची माहिती मिळाली असून आता चिंग्याच्याप्रकरणातही निलंबनाची कारवाईची टांगती तलवार आहे.