रांजणगाव । साडेअठरा कोटींचे सिगारेटचे बॉक्स घेऊन जाणारा कंटेनर वाहनचालकानेच पळवल्याची घटना रांजणगाव एमआयडीसी येथे घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कंटेनर ट्रान्सपोर्टचे मॅनेजर मनोहर मिश्रा (रा. वडगाव शेरी) यांनी रांजणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंटेनरचालक कमल अहमद (रा. धारावी, मुंबई) विरुद्ध मालाचा अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसीतील आयटीसी टोबॅको कंपनीतून सिगारेटचे बॉक्स भरलेला जिकॉम लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट कंपनीचा कंटेनर क्र. एमएच 12 एचडी 6008 हा अंबरनाथ, ठाणे येथील एका कंपनीत माल खाली करण्यासाठी गुरुवारी (दि.7) दुपारी 4.45 च्या सुमारास निघाला होता. यामध्ये महागड्या किंमतीचे सिगारेटचे 865 बॉक्स होते. मालाची किंमत 18 कोटी 90 लाख 74 हजार 717 रुपये इतकी होती. संबंधित कंटनेर शुक्रवारी (दि.8) सकाळी 6 ते 7 वाजण्याच्या दरम्यान ठाण्यातील संबधीत कंपनीत पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, कंटेनर पोहोचला नसल्याची माहिती मिश्रा यांना कंपनीतून मिळाली. त्यामुळे त्यांनी तातडीने कंटनेर चालकाजवळ याची चौकशी करण्यास फोन लावला. मात्र, चालकाचा फोन न लागल्याने मिश्रा यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे करीत आहेत.