अमळनेर। खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयातील 18 प्राध्यापकांच्या बेकायदेशीर भरतीच्या वादात शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी ना हरकत प्रमाणपत्र रद्द करून ही भरती रद्द करण्याचे आदेश खान्देश शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, सचिव आणि प्राचार्यांना दिले आहेत. अमळनेर येथील लोटन महारु चौधरी यांनी प्रताप महाविद्यालयात झालेली 18 प्राध्यापकांची भरती बेकायदेशीर असल्याची तक्रार उपसंचालकांकडे केली होती.
उपसंचालकांवरही आरोप
कार्यकारिणीने जानेवारीमध्ये जाहिरात न देता भरती केली होती. उपसंचालकांनी गैरव्यवहार करून ना हरकत देत या उमेदवारांना शिक्षण सेवकांची मान्यता दिल्याचा आरोप करण्यात येत होता. आमदार चंदूलाल पटेल यांनी जाब विचारला असता उप संचालकांनी कोणतीही मान्यता दिली नसल्याचे सांगून हात झटकले होते. तक्रारदाराने एक प्राध्यापिका पारोळा महाविद्यालयात असतानाही अमळनेर महाविद्यालयाच्या हजेरीपत्रकावर मार्चपासून सह्या करीत असल्याचे पुरावे दिले होते. उर्वरित 18 प्राध्यापकांच्या सह्या वेगळ्या हजेरी पत्रकावर घेतल्या जातात व शिक्षण उपसंचालकांनीही भ्रष्टाचार केल्याचा आरोप चौधरी यांनी तक्रारीत करून गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता. शिक्षण उपसंचालकाकडून असे कोणतेही पत्र कार्यालयात प्राप्त झाले आहे किंवा नाही, हे माहित नाही मी बाहेरगावी होतो उद्या कार्यालयात गेल्यावर समजेल, असे सचिव प्रा.पराग पाटील यांनी सांगितले.