पालिकेवर पडणार 13 कोटींचा अतिरिक्त भार
मुंबई : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय बाळ स्वास्थ्य कार्यक्रम महाराष्ट्रासह देशभरात 2013पासून राबवण्यात येत आहे. मात्र, मुंबई महापालिकेने 2017 पासून या अभियानाची अंमलबजावणी सुरू केली आहे. याअंतर्गत 18 वर्षांपर्यंतच्या मुलांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. अंगणवाडी, बालवाडी, शालेय मुलांच्या आरोग्याची तपासणी करून जन्मतः व्यंग, पोषणमुल्यांची कमतरता, शारीरिक व मानसिक विकासात्मक विलंब व आजार यांचे निदान लवकरात लवकर करून त्यांना तातडीने उपचार मिळावेत हा या अभियानामागचा मुख्य उद्देश आहे. पालिकेला या अभियानाचा लाभ 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना देण्यासाठी किमान 13 कोटींचा आर्थिक भर पडणार आहे. यासंदर्भातील माहितीपर प्रस्तावाला स्थायी समितीच्या बुधवारी मंजुरी दिली. त्यामुळे आता मुंबईतील 18 वर्षांपर्यंतच्या मुलांना आरोग्याच्या दृष्टीने पालिका रुग्णालयाकडून मोठा दिलासा मिळणार आहे.
या अभियानाअंतर्गत आरोग्य विषयक समस्या/अडचणीचे निवारण करणे, योग्य ती संदर्भ सेवा देणे, किरकोळ गंभीर आजारांवर वैद्यकीय उपचार शल्य चिकित्सा/शस्त्रक्रिया करणे व पाठपुरावा करणे संबंधित यंत्रणेला अनिवार्य करण्यात आले आहे.अंगणवाडीत 6 वर्षांपर्यंतच्या मुलांची संख्या 2 लाख 69 हजार 893 इतकी असून या मुलांना एकापेक्षा जास्त आजार, दोष असू शकतात. तसेच एकूण अंदाजित रुग्णांची संख्या 3 लाख 85 हजार 976 इतकी असणार आहे.
पालिकेला या मुलांना वैद्यकीय उपचार रुग्णालयात देण्यासाठी केस पेपरचे 10 रुपये शुल्क पाहता त्यासाठी किमान 38 लाख 59 हजार 760 रुपये खर्च येणार आहे. त्यानंतर पाठपुरावाच्या तीन केस पेपरसाठी 92 लाख 31 हजार 210 रुपये खर्च येणार आहे. तसेच विविध आजारांवरील चाचण्या व उपचार यासाठी किमान 11 कोटी 48 लाख 73हजार 460 रुपये इतका म्हणजे एकूण खर्च 12 कोटी 79 लाख 64 हजार 430 रुपये इतका आर्थिक भार पालिकेला या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी सोसावा लागणार आहे.