जळगाव। महावितरण ग्राहकांच्या सेवेसाठी नेहमीच कटीबध्द असते. यासाठी सातत्याने ’महावितरण आपल्या दारी’ सारखे नवनवीन उपक्रम महावितरण राबवित असते. याचाच एक भाग म्हणून महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी राज्यभरातील ग्राहकांसाठी ग्राहकसंपर्क अभियान राबविण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे राज्यभरात राबविलेल्या ग्राहक संपर्क अभियानात सुमारे 18 हजार 555 ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडविण्यात आल्या आहेत. महावितरणच्या राज्यभरातील 16 परिमंडळासाठी जुलै 2016 मध्ये हे ग्राहकसंपर्क अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत राज्यभरात 1 हजार 746 ग्राहक मेळावे घेण्यात आले. या ग्राहकसंपर्क अभियानात वीज ग्राहकांसाठी नवीन वीज जोडणी, नावात बदल, वीजभार बदलणे, सदोष किंवा चुकीच्या वीजबिलांची दुरुस्ती, सदोष किंवा जळालेले मीटर बदलण्यासह इतरही तक्रारी सोडविण्यात आल्या.
22 हजार 966 तक्रारी दाखल झाल्या होत्या
अभियानांतर्गत महावितरण संबंधी 22 हजार 966 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 18 हजार 555 तक्रारी तात्काळ सोडविण्यात आल्या. उर्वरित 4 हजार 411 प्रलंबित तक्रारी निर्धारित मुदतीत सोडविण्यात येत असून त्याची माहिती संबंधित वीजग्राहकांना देण्यात येत आहे. एकूण तक्रारींपैकी सर्वाधिक तक्रारी सदोष किंवा चुकीच्या वीजबिलींगबाबत असून त्यावर महावितरणकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या संदर्भात चुकीचे रिडिंग घेणार्या एजन्सींवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश संजीव कुमार यांनी दिले आहेत. महावितरणच्या ग्राहकसंपर्क अभियानाला संपूर्ण राज्यात वीज ग्राहकांनी मोठा प्रतिसाद दिला. तसेच या अभियानात नवीन वीजजोडणी, इतर वीजसेवेविषयकच्या तक्रारी तात्काळ सोडविण्यात आल्यामुळे वीज ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.