18 जुलैला रेशन दुकानदारांचा संसद भवनावर मोर्चा

0

भामेर। ऑल इंडीया फेयर शॉप डिलर फेडरेशन नवी दिल्लीच्या आवाहनानुसार 18 जुलै रोजी संपूर्ण भारतातील रेशन दुकानदारांचा भव्य मोर्चा संसद भवनावर आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चासाठी साक्री तालुक्यातून 200 रेशन दुकानदार रवाना झाले आहे.

रेशन दुकानदारांना चतुर्थश्रेणी कर्मचार्यांच्या वेतना इतके मानधन देण्यात यावे. या प्रमुखमागणीसह रेशन दुकानदारांच्या विविध मागण्यासाठी 18 जुलै रोजी 11 वाजता दिल्ली येथे रामलीला मैदानापासून मोर्चाला सुरूवात होणार असून अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार केरोसीन परवाना धारक महासंघ यांच्या आवाहनानुसार 150 दुकानदार खासगी वाहनाने रवाना झाले असून 50 दुकानदार रेल्वेने रवाना झाले आहेत. यात धुळे जिल्ह्यातून जास्तीत जास्त उपस्थिती रहावी म्हणून संघटनेने कठोर मेहनत घेतली. दुकानदार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव नांद्रे, साक्री तालुका अध्यक्ष प्रविण खैरनार, शिरपूर तालुकाध्यक्ष राजु टेलर, शिंदखेडा तालुका अध्यक्ष भाईदास पाटील, धुळे तालुकाध्यक्ष मधुकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली रवाना झाले आहेत.