नंदुरबार । अत्यंत चुरशीच्या वातावरणात झालेल्या नंदुरबार नगरपालिका निवडणुकीच्या निकालाची जिल्ह्यातील नागरिकांनाच नव्हे तर नजीकच्या गुजरात, मध्यप्रदेश मधील नागरिकांनाही उत्सुकता लागली आहे. नंदुरबारबरोबरच नवापूर, तळोदा पालिकेच्या मतदानाची मतमोजणी सोमवारी 18 डिसेंबर रोजी होणार आहे. तळोदा पालिकेसाठी रविवारी मतदान होणार आहे. तिघा पालिकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
101 उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल
नवापूरात 19 हजार 99 मतदारांनी केले मतदान केले असून धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निकालाची सर्वांना उत्सुकता लागून असून 101 उमेदवारांचे भवितव्याचा निकाल सोमवारी लागणार आहे. 10 प्रभागात 20 नगरसेवक व 1 नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी 101 उमेदवारांचे भवितव्य ई व्ही एम मशिनमध्ये 13 तारखे पासुन बंद आहे. नगर पालिका टाऊन हाँल येथे कडक बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहे. कोण जिंकेल व पराभुत होईल याबाबत अनेक अंदाज बांधले गेले आहेत.मतदानाचा दिवशी अनेकांनी लालसेपोटी उशिरा मतदान केंद्रावर पोहचले व मतदान केंद्रावरील गर्दी व भानगडी पाहुन अनेक मतदारांना मतदान करता आले नाही. तर काहीनी मतदान केले नसल्याचे बोलले जात आहे. 13 रोजी महाराष्ट्रात शिक्षक अभियोग्यता परिक्षा होती अनेक शिक्षक बाहेर परिक्षेला गेल्यामुळे ते मतदाना पासुन वंचित राहील्याचे बोलले जात आहे. सोमवारी काय निकाल लागतो याची सर्वांना उत्सुकता लागून आहे.
भाजप- काँग्रेसमध्ये खरी लढत; दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
नंदुरबार नगरपालिकेवर सत्ता कुणाची प्रस्थापित होईल,कोण होणार नगराध्यक्ष याबाबत लाखो रुपयांच्या पैजा देखील लागल्या आहेत, पहिल्यांदाच मतदानाची टक्केवारी वाढली असल्याने निवडणुकीतील उमेदवारांची छातीत धडकी भरली आहे,गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत 58 टक्के मतदान झाले होते, यंदाच्या निवडणुकीत 71 टक्के इतके मतदान झाले आहे, त्यामुळे याचा फायदा कुणाला होतो,याचा अंदाज घेतला जातो आहे, नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या रत्नाताई रघुवंशी तर भाजपचे डॉ, रवींद्र चौधरी यांच्यात खरी लढत होती. या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी त्यांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले आहे.
तळोद्यात आज मतदान
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा पालिकेच्या निवडणुकीसाठी रविवारी 17 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी सोमवारी 18 डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही निवडणूकीची तारीख बदलण्यात आलेली होती. त्यानुसार रविवारी मतदान होणार आहे. तळेद्यात मुख्यमंत्र्यांनी सभा घेऊन, पारदर्शक कारभार झाला नाही तर पालिका बरखास्तीचा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचे सर्वांचे लक्ष लागून आहे.